अजित पवार-चंद्रराव तावरे एकत्र : 25 वर्षांचे राजकीय वैर संपुष्टात | पुढारी

अजित पवार-चंद्रराव तावरे एकत्र : 25 वर्षांचे राजकीय वैर संपुष्टात

सांगवी : एकीकडे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आपली कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकरिता बारामती तालुक्यातील जुन्या राजकीय नेत्यांना भेटून मदत मागत असतानाच, दुसरीकडे निरा नदीचे होत असलेले प्रदूषण रोखणे, शेतकर्‍यांच्या उसाला आणि दुधाला योग्य दर मिळावा, या शेतकर्‍यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांसह इतर विषयांवर लोकसभा निवडणुकीसाठी जुळवाजुळव होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने 25 वर्षांचे राजकीय वैर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष व विद्यमान ज्येष्ठ संचालक सहकारमहर्षी चंद्रराव तावरे यांच्यात समझोता घडवून आणला आहे. निरा खोर्‍यात तावरे आणि पवार एकत्र आल्याने लोकसभेसाठी जुळवाजुळव होताना पाहायला मिळत आहे.

बारामतीच्या पवार घराण्यात गेल्या पन्नास वर्षांत पहिल्यांदाच फूट पडली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या नणंद-भावजय एकमेकांविरोधात उभ्या आहेत. पवार कुटुंबातील फुटीमुळे तालुक्यातील जनता बुचकळ्यात पडली होती. परंतु, आता जसजशी निवडणूक जवळ येत चालली तसतशी मतांच्या जुळवाजुळवीलाही वेग आला आहे. त्याच अनुषंगाने वरील मोर्चेबांधणी होताना पाहायला मिळत आहे.

सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी आपापल्या परीने प्रचाराला एक महिन्यापूर्वीच सुरुवात झाली आहे. परंतु, सांगवीसह काही मोठ्या गावांमध्ये अजित पवार गटाच्या प्रचाराला सुरुवात झाली नव्हती. दोन दिवसांपूर्वी सांगवी येथे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ चंद्रराव तावरे, रंजनकुमार तावरे, संभाजी होळकर, प्रकाशराव तावरे, युवराज तावरे-पाटील, किरण तावरे, महेश तावरे, अनिल तावरे, प्रतापराव तावरे यांच्यासह ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्या वेळी बोलताना चंद्रराव तावरे म्हणाले की, ही देशाच्या भवितव्याची निवडणूक आहे. प्रत्येकाने गट-तट, भावकी, गावकी विसरून सुनेत्रा पवार यांनाच निवडून देण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा

Back to top button