Loksabha election : पंतप्रधान मोदींचा सोमवारी सभेनंतर पुण्यात मुक्काम? | पुढारी

Loksabha election : पंतप्रधान मोदींचा सोमवारी सभेनंतर पुण्यात मुक्काम?

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणूक प्रचारासाठी येत्या सोमवारी (दि. 29) पुण्यात येणार असून, त्या दिवशी त्यांचा मुक्काम पुण्यातील राजभवन येथे राहणार असल्याची शक्यता आहे. त्यांची सभा पुण्यातील स. प. महाविद्यालयाचे मैदान किंवा रेसकोर्स मैदानात होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ असे चार मतदारसंघ आहेत. त्यापैकी दोन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), तर प्रत्येकी एका ठिकाणी भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांचे उमेदवार उभे आहेत. त्यांच्या प्रचारासाठी मोदी येणार आहेत. त्या दिवशी पुणे शहरात त्यांचा रोड शो करण्याचाही विचार आहे. मात्र, सभेच्या ठिकाणावर ते अवलंबून राहणार आहे.

पंतप्रधान मोदी हे देशभर दौरे करीत प्रचार करीत आहेत. विदर्भात, मराठवाड्यात पहिल्या दोन टप्प्यातील निवडणुकीसाठी त्यांच्या सभा झाल्या. मोदी यांची सोमवारी दुपारी लातूर येथे जाहीर सभा झाल्यानंतर, सायंकाळी ते पुण्यात सभा घेणार आहेत. त्या दिवशी पुण्यात त्यांचा मुक्काम राहण्याची शक्यता आहे. सोलापूर, माढा मतदारसंघातील वेळापूर आणि सातारा येथे 30 एप्रिल रोजी त्यांच्या सभा होणार आहेत. मोदी यांचा अधिकृत दौरा अद्याप आलेला नसून, दोन दिवसांचा हा संभाव्य दौरा असल्याची माहिती भाजपच्या नेत्यांनी दिली.

हेही वाचा

Back to top button