चीनच्या उपग्रहांनी टिपली चंद्र-पृथ्वीची प्रतिमा | पुढारी

चीनच्या उपग्रहांनी टिपली चंद्र-पृथ्वीची प्रतिमा

बीजिंग : चीनच्या प्रायोगिक मून सॅटेलाईटस् ‘तियांदू-1 व 2’कडून चंद्रावर संवाद व दळणवळणाच्या तंत्रज्ञानाच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. नुकतीच त्यांनी चंद्राच्या पृष्ठभागाची एक प्रतिमा टिपली, ज्यामध्ये बाजूला पृथ्वीही दिसून येते. खरे तर या प्रतिमेला अनेक संशोधक ‘हाँटिंग’ म्हणजेच ‘भयावह’ ठरवत आहेत. यामध्ये पृथ्वी अंधारी, भयावह दिसून येते!

चीनने चंद्राबाबतही आपल्या महत्त्वाकांक्षी योजना सुरू केलेल्या आहेत. त्यामध्येच या दोन छोट्या प्रायोगिक उपग्रहांचा वापर केला जात आहे. भविष्यातील चंद्राच्या कम्युनिकेशन आणि नेव्हिगेशन सर्व्हिसेसना डोळ्यांसमोर ठेवून हे दोन उपग्रह तिथे विविध चाचण्या घेत आहेत. 19 मार्चला ‘तियांदू-1’ आणि ‘तियांदू-2’ हे दोन उपग्रह ‘क्वेकिओ-2’ सोबत सोडण्यात आले होते. चीनच्या भविष्यातील ‘चेंगी-6’ चांद्रमोहिमेत त्यांच्या कामाचा उपयोग होऊ शकतो. या मोहिमेत चंद्राच्या दुर्गम भागातील नमुने पृथ्वीवर आणले जाणार आहेत.

पुढील महिन्यातच ही मोहीम सुरू होऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीचा एक भाग म्हणून हे उपग्रह सोडलेले आहेत. त्यांनी टिपलेल्या चंद्राच्या प्रतिमेत बाजूला अंधारात दडलेल्या पृथ्वीचीही छबी दिसते. 3 एप्रिलला हे दोन्ही उपग्रह चंद्राच्या कक्षेत पोहोचले होते. ते चंद्रापासून 200 किलोमीटर अंतरावरील कक्षेतून फिरत आहेत. ‘चेंगदू-1’ हा 61 किलोचा, तर ‘चेंगदू-2’ हा 15 किलो वजनाचा उपग्रह आहे.

Back to top button