तब्बल तीन कोटी वर्षांपूर्वीची आहे नाईल नदी | पुढारी

तब्बल तीन कोटी वर्षांपूर्वीची आहे नाईल नदी

लंडन : ‘जगातील सर्वात लांब नदी’ अशी ओळख नाईल नदीला आहे. आफ्रिकेतील सर्वात मोठे सरोवर व्हिक्टोरियामध्ये उगम पावून ही नदी सहारा वाळवंटाचा पूर्व भाग पार करीत उत्तरेला भू मध्य सागराला जाऊन मिळते. ही नदी तीन कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात आली, असे एका संशोधनातून स्पष्ट झाले होते.

जगातील सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक असलेल्या इजिप्तच्या संस्कृतीत नाईल नदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आफ्रिका खंडातून वाहणारी आणि जगातील सर्वाधिक लांब असणार्‍या नाईल नदीचे अस्तित्व पूर्वी गृहीत धरल्यापेक्षा सहा पटीने जास्त काळापासून आहे, असा निष्कर्ष एका संशोधनातून काढण्यात आले होते. नाईल नदीचा उगम तीन कोटी वर्षांपूर्वी झाला असल्याचा दावा भूगर्भशास्त्रज्ञांनी केला. ‘नेचर जिओसायन्स’ या नियतकालिकामध्ये याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात आली. अमेरिकेतील ऑस्टिन येथील टेक्सास विद्यापीठातील संशोधकांनी नाईलबद्दल संशोधन केले आहे. दीर्घायुषी नद्यांच्या प्रवाहात वेळोवेळी बदल होत असतो; पण नाईल नदीचा प्रवाह स्थिर राहिला आहे, हे एक न उलगडलेले कोडे आहे.

नाईलचा उगम कधी झाला आणि ती प्रदीर्घ काळ तिचे अस्तित्व कायम कसे राहिले, हा महत्त्वाचा प्रश्न असून, त्यावरील आमचे उत्तर उत्कंठावर्धक आहे, असे इटलीमधील रोमा ट्री विद्यापीठातील भूगर्भशास्त्रज्ञ क्याऊडिओ फॅसेन्ना यांनी सांगितले. नाईलच्या स्थिरावस्थेबद्दल प्रा. फेसेन्ना आणि त्यांच्या सहकार्‍यांनी नदीच्या इतिहासाचा शोध घेतला.

यासाठी त्यांनी इथिओपियाच्या डोंगराळ प्रदेशातील प्राचीन ज्वालामुखीजन्य खडकांचे पृथक्करण करण्यात आले. इथिओपियन डोंगररांगांची निर्मिती व वाढ वेगाने झाल्यानंतर त्यांची उंची लाखो वर्षे कायम राहिली आहे. इथिओपियन पठाराच्या भौगोलिक रचनेची निर्मिती तीन कोटी वर्षांपूर्वी झाल्याचे ज्ञात आहे, अशी माहिती टेक्सास विद्यापीठाचे भूभौतिकतज्ज्ञ थ्रोस्टेन बेकर यांनी दिली आहे.

Back to top button