पुणे : पुढारी वृत्तसेवा : भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था अर्थात आयसरने प्रवेश प्रक्रियेत बदल केले आहेत. पदवी अभ्यासक्रमासाठी संयुक्त प्रवेश परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जात होते. परंतु, या वर्षापासून आयसरचे प्रवेश हे केवळ आयसर अॅप्टिट्यूड टेस्टद्वारे होणार आहेत. त्यामुळे जेईई मेन्स, जेईई अॅडव्हान्स किंवा केव्हीपीवाय आदी परीक्षांचे गुण ग्राह्य धरले जाणार नसल्याची माहिती आयसर कोलकाताच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद नातू यांनी दिली. केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणार्या आयसर शिक्षण संस्थेच्या पुण्यासह तिरुपती, भोपाळ, मोहाली, तिरुअनंतपुरम, कोलकाता, बेहरामपूर या सात ठिकाणी शैक्षणिक संकुले आहेत. विज्ञान आणि मानव्य विज्ञानातील पदवी, पदव्युत्तर, संशोधनातील चार वर्षांचा पदवी (बीएस) अभ्यासक्रम, पाच वर्षांचा पदव्युत्तर पदवी (बीएस-एमएस) हे अभ्यासक्रम येथे राबविले जातात.
प्रवेश प्रक्रियेसंदर्भात डॉ. नातू म्हणाले, आतापर्यंत जेईई मेन्स, जेईई अॅडव्हान्स किंवा केव्हीपीवाय आदी परीक्षांचे गुण आयसरच्या प्रवेशासाठी ग्राह्य धरले जात होते. परंतु, अलीकडील काळात संबंधित परीक्षांचे वेळापत्रक जुळत नसल्याने आयसरचे प्रवेश केवळ आयसर अॅप्टिट्यूड टेस्टद्वारे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्यांदाच अशा पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. आयआयएसी बंगळुरूच्या प्रवेशासाठी किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेतील (केव्हीपीवाय) गुणवंत विद्यार्थ्यांची निवड केली जात होती. परंतु, आता ही परीक्षा केंद्र सरकारने बंद केल्यामुळे आयसर संस्थेने तयार केलेल्या आयसर अॅप्टिट्यूड टेस्टद्वारे आयआयएसीच्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात येत आहे. यातून आयसर अॅप्टिट्यूड टेस्टचा दर्जा उत्तम असल्याचे दिसून येत आहे. पुढील वर्षापासून आयसर, नायसर, आयआयएसी बंगळुरू आदींच्या प्रवेशासाठी एकच प्रवेश परीक्षा व्हावी, यासाठी प्रयत्नशील असल्याचे देखील डॉ. नातू यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा