दहावी-बारावीचा निकाल यंदा मे महिन्यातच! | पुढारी

दहावी-बारावीचा निकाल यंदा मे महिन्यातच!

गणेश खळदकर

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी-बारावी परीक्षेचा निकाल यंदा पहिल्यांदाच मे महिन्यात जाहीर होणार आहे. मे महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात बारावीचा, तर चौथ्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने राज्य मंडळ जलदगतीने तयारी करीत असल्याची माहिती राज्य मंडळातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली आहे. राज्य मंडळाकडून नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावीची परीक्षा 1 ते 26 मार्च आणि बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च यादरम्यान घेण्यात आली.

दहावी-बारावीची परीक्षा सुरू असतानाच संबंधित विषयाची परीक्षा संपली की पेपर तपासणीचे काम सुरू करण्यात आले होते. पेपर तपासणी झाल्यानंतर संबंधित विषयाच्या उत्तरपत्रिका जमा करण्यासाठी संकलन केंद्रांवर जमा करण्यासाठी ठरावीक मुदत देण्यात आली होती. त्यानुसार उत्तरपत्रिका संकलित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दरवर्षी कोकण आणि मुंबई विभागाकडून उत्तरपत्रिका संकलन

आणि अन्य काम उशिरापर्यंत सुरू असते. यंदा मात्र या दोन्ही विभागांचे काम पूर्ण झाले आहे. तसेच, राज्य मंडळाने यंदा उत्तरपत्रिका ठरावीक ठिकाणी जाऊन गोळा करण्यासाठी यंत्रणा कामाला लावली आहे. त्यामुळे उत्तरपत्रिका गोळा करण्यासाठीचा कालावधी वाचला आहे. तसेच, परीक्षा झाली की दरवर्षी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार किंवा परीक्षा काळात शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा कामास नकार, असे प्रकार सर्रास घडतात. यंदा मात्र असे कोणतेही प्रकार घडलेले नाहीत. त्याचबरोबर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे वातावरण राहणार आहे. त्यामुळे देखील निकाल लवकर लावण्यावर राज्य मंडळाचा भर असल्याचे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

दरवर्षी बारावीचा निकाल जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात, तर दहावीचा निकाल जुलै महिन्यात पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात लागत असतो. परंतु, यंदा मात्र परीक्षांमध्ये कोणताही मोठा गैरप्रकार होण्यापासून रोखण्याची कामगिरी करणार्‍या राज्य मंडळाने निकाल लवकर लावण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यामुळे यंदा पहिल्यांदाच मे महिन्यातच दोन्ही निकाल जाहीर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यंदा दहावी तसेच बारावीचा निकाल मे महिन्यातच जाहीर करण्यासाठी राज्य मंडळ प्रयत्नशील आहे. त्यानुसार मे महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात बारावीचा, तर चौथ्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने राज्य मंडळाकडून दैनंदिन फॉलोअप सुरू असून, निकालाचे काम जलदगतीने करण्यासाठीच्या आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.

– शरद गोसावी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

हेही वाचा

Back to top button