नवी दिल्ली : 2005 मध्ये गुजरात राज्यात एका सांगाड्याचे जीवाश्म सापडले होते. सुरुवातीला संशोधकांना ते मगरीचे असावे, असे वाटले होते. मात्र आता हे स्पष्ट झाले आहे की, हे जीवाश्म जगातील सर्वात मोठ्या सर्पांपैकी एकाचे आहे. असे सर्प एकेकाळी भारतात वावरत होते. या सापाला 'वासकी इंडिक्स' असे नाव देण्यात आले आहे. हे साप 36 फूट ते 50 फूट लांबीचे असावेत, असे संशोधकांना वाटते. आयआयटी रूडकीच्या संशोधकांनी याबाबतचे अध्ययन केले आहे.
या संशोधनामुळे उत्क्रांतीच्या टप्प्यातील निसटलेल्या दुव्यांचा शोध घेणे शक्य होईल, असे संशोधकांना वाटते. 47 कोटी वर्षांपूर्वी असे सर्प या पृथ्वीतलावर वावरत होते. या प्रजातीला पौराणिक वासुकी नागाचे नाव देण्यात आले आहे. 'सायंटिफिक रिसर्च' या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्तराखंडच्या आयआयटी रूडकीमधील दोन संशोधकांनी हा रिसर्च पेपर लिहिला आहे. त्यांनी 27 जीवाश्मभूत सांगाड्यांतील हाडांचा अभ्यास केला.
त्यापैकी काही अद्यापही सुस्थितीत आहेत. 2005 मध्ये गुजरातच्या एका कोळसा खाणीत ही हाडे सापडली होती. ती प्राचीन काळातील मगरीसारख्या प्राण्याची असावीत, असे सुरुवातीला वाटले होते. 2023 मध्ये हे स्पष्ट होत गेले की, ही हाडे मगरीची नसून एका महाकाय सर्पाची आहेत. हा साप 20 फुटांपेक्षा अधिक लांबीचा होता. त्याचे शरीर रुंद आणि जाड होते. त्याच्या इतक्या लांबीमुळे तो झाडावर चढू शकत नव्हता, असे संशोधकांना वाटते. अद्याप या सर्पाचा संपूर्ण सांगाडा सापडलेला नाही.