नवी दिल्ली : देशात प्रथमच स्तनाच्या कर्करोगावर यशस्वी रोबोटिक सर्जरी करण्यात आली आहे. दिल्लीच्या एका खासगी रुग्णालयाने हा दावा केला आहे. या रुग्णालयाकडून सांगण्यात आले की, दोन महिलांमध्ये ऊती पुनर्निर्माणसहित स्तनालाही बचावण्यात आले आहे. शस्त्रक्रियेवेळी महिलांमधील स्तन काढण्याची गरज पडली नाही.
पंजाबी बागमधील सी. के. बिर्ला हॉस्पिटलच्या ओंकोलॉजी सर्जरी विभागाचे संचालक डॉ. मनदीपसिंह मल्होत्रा यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, प्रसूतीनंतर 27 वर्षांच्या एका महिलेला स्तनात गाठ असल्याची जाणीव झाली. गरोदरपणात आणि स्तनपानाच्या काळात स्तनांमध्ये असे बदल समोर येत असतात. सुरुवातीला या महिलेने त्याकडे दुर्लक्ष केले. नंतर तपासणीअंती दिसून आले की, हा स्तनाच्या कर्करोगाचा सुरुवातीचा टप्पा आहे. त्यानंतर संबंधित महिलेस केमोथेरपी, इम्युनोथेरपी आणि नॅचरल सप्लिमेंट्स देण्यात आले. केमोथेरपी ही ट्यूमरच्या ऑप्टिकलला हटवण्यासाठी सहायक असते. या महिलेवर कोणत्याही त्रासाशिवाय टिश्यू म्हणजेच ऊती पुनर्निर्माणसहित स्तन वाचवण्यासाठी सर्जरी करण्यात आली.
कर्करोगामुळे या महिलेचे दोन्ही स्तन हटवले जाण्याची भीती होती. मात्र, ती वेळ आली नाही व आता ती आपल्या बाळास स्तनपान करते. याच तंत्राने दुसर्या एका प्रकरणात साठ वर्षे वयाच्या महिलेची ब—ेस्ट सर्जरी करण्यात आली. तिच्या स्तनांमध्ये तीन गाठी होत्या. आता उपचारानंतर ही महिला निरोगी जीवन जगत आहे. डॉक्टरांनी सांगितले की, ही दुर्मीळ सर्जरी आहे, ज्यामध्ये लॅटिसिमस फ्लॅप पुनर्निर्माणचा वापर केला जातो. सर्जरीमध्ये रोबोच्या मदतीने फोटो अधिक अचूक व चिरफाडीचा आकार कमी होतो. तसेच या प्रक्रियेत स्तनाच्या त्वचेचेही नुकसान होत नाही.