अपूर्ण विकासकामांना जबाबदार कोण? बिबवेवाडीतील गंगाधाम चौकाची झाली दुरवस्था

अपूर्ण विकासकामांना जबाबदार कोण? बिबवेवाडीतील गंगाधाम चौकाची झाली दुरवस्था

बिबवेवाडी : पुढारी वृत्तसेवा : गंगाधाम चौकातील विविध प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी महापालिका प्रशासनाला वेळ नसल्यामुळे चौकाची दुरवस्था झाली आहे. फुटपाथ, रस्ता दुभाजक, दुभाजकावरील उद्यान व चौकाचा विविध कॉर्नर भागांची दुरवस्था झाली आहे. तसेच, परिसरात कचर्‍याचे ढीग साचले आहेत. प्रशासकराज व्यवस्थेत स्मार्ट सिटीचा पूर्णतः खेळखंडोबा झाला असल्याचा आरोप स्थानिक
नागरिक करत आहेत.

पुणे शहराची देशातील स्मार्ट सिटीमध्ये गणना झाल्यानंतर शहरात विविध विकासकामे झपाट्याने केली, त्यात तत्कालीन माननीय, महापालिका अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील ठेकेदार यांनी महापालिकेच्या विकासकामांचा निधी वापरून स्मार्ट सिटी करण्याचा संकल्प केला होता. पण, विकासकामांचा निधी वापरूनही विकासकामे पूर्णत्वास गेली नाहीत, याला जबाबदार कोणाला धरायचं, हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

मार्केट यार्डमधील गंगाधाम चौकाचे सुशोभीकरण करण्यासाठी तत्कालीन माननीय यांनी आपला निधी वापरून चौकातील विविध दुरुस्ती केली. अगदी रस्ता दुभाजकांसह फुटपाथलाही विद्युत दिवे लावले, पण ते दिवे व डागडुजी ठेकेदारांची बिले मिळेपर्यंतही राहिली नाहीत. बिल निघण्यापूर्वीच पूर्ण चौकाची दुरवस्था झाली आहे.

एका बाजूला फुटपाथच्या विद्युत वायरिंग केव्हाच निघून गेल्या आहेत, प्लास्टिकचे दुभाजक तुटलेले आहेत. रस्ता दुभाजकावरील असलेली झाडी, वृक्ष कधीच सुकून गेली आहेत, तर कचरा साचून राहिला आहे. वाळलेल्या रोपांमुळे, वृक्षांमुळे रस्ता दुभाजक भयानक दिसत आहे. ठेकेदाराने काढून ठेवलेले पेवर ब्लॉक व तळीरामांनी उभारलेला अड्डा हे भयानक वास्तव सध्या गंगाधाम चौकात पाहायला मिळत आहे. जनतेच्या कर रूपातून जमा झालेल्या लाखो रुपयांची अशी उधळपट्टी करून नेमके काय साध्य करायचे आहे, असा प्रश्न स्थानिक नागरिक व करदाते करत आहेत.

प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ

गंगाधाम चौकातील दुरवस्थेच्या संदर्भात महापालिकेच्या उद्यान विभागाकडे, पथविभागाकडे, विद्युत विभागाकडे चौकशी केली असता सुटीच्या दिवशी फोन घेण्यास व प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली.

चौकाच्या सुशोभीकरणासाठी लाखो रुपये खर्चूनही प्रश्न अनुत्तरित आहेत. चौकात भिक्षेकरी सतत असल्याने प्रचंड कचरा निर्मिती होते. तसेच, उंदीर-घुशींमुळे स्थानिक दुकानदारांना खूप त्रास होत आहे.

– सुरेश चौधरी, स्थानिक रहिवासी, गंगाधाम चौक, पुणे.

गंगाधाम चौकातील रस्ता दुभाजकाची देखभाल व दुरुस्ती उद्यान विभागाकडे असून, याबाबत संबंधित अधिकारी, कर्मचार्‍यांना कळविले जाईल. तसेच, चौकातील कोपर्‍यान्कोपर्‍यात असलेला कचरा त्वरित काढून घेतला जाईल.

– सुनील मोहिते, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय, महापालिका पुणे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news