अवकाळी पावसाचे बारामतीत थैमान : ऊस भुईसपाट | पुढारी

अवकाळी पावसाचे बारामतीत थैमान : ऊस भुईसपाट

बारामती : पुढारी वृत्तसेवा : असह्य उकाड्यानंतर बुधवारी (दि. 17) सायंकाळनंतर बारामती तालुका व तद्नंतर रात्री उशिरा शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. शहराच्या तुलनेत तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर अधिक होता. कोर्‍हाळे बुद्रुक, वडगाव निंबाळकर परिसरात गारांसह पाऊस झाला. जोरदार सोसाट्याच्या वादळी वार्‍याने उसाचे पीक भुईसपाट झाले. सायंकाळी सहा ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत सोसाट्याचा वारा आणि विजेच्या कडकडासह सोमेश्वरनगर, वडगाव निंबाळकर, पणदरे, पणदरे खिंड परिसर, माळेगाव, शारदानगर, कोर्‍हाळे बुद्रुक परिसरात वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. बारामती तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला आहे.

या पार्श्वभूमीवर या पावसाने काहीसा दिलासा दिला. परंतु सोबत आलेल्या वादळी वार्‍याने प्रचंड नुकसानही केले. ग्रामीण भागात पाऊस सुरू होताच गायब झालेला वीजपुरवठा गुरुवारी दुपारपर्यंत पूर्वपदावर आलेला नव्हता. शेतातील उसासारखे मजबूत पीक भुईसपाट झाले. तरकारी पिके झोपली. फळबागांची फळे खाली पडून सर्वत्र सडा पडला. जवळपास दोन तास वादळी वार्‍यासह पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. काही ठिकाणी झाडे पडली, फांद्या रस्त्यावर पडल्या. त्यामुळे निरा-बारामती रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.

माळेगाव परिसरात चारा पिके भुईसपाट

बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात जोरदार वारा आणि विजेच्या कडकडाटात पावसाने हजेरी लावली. जोरदार पावसामुळे या भागातील बहुतांशी शेतातील पिके व फळबागा उद्ध्वस्त झाल्या. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. पिकांचा पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

बारामती तालुक्यात गेले दोन दिवस उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झाला होता. बुधवारी (दि. 17) सायंकाळी सहाच्या सुमारास माळेगाव, पणदरे, खांमगळवाडी, ढाकाळे, सोनकसवाडी या भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. शासनाने उद्ध्वस्त पिकांचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाऊसाहेब खामगळ, रमेशराव रासकर, वसंतराव जगताप या शेतकर्‍यांनी केली आहे

हेही वाचा

Back to top button