पुणे : पुढारी वृत्तसेवा : फेसबुकवरील जाहिरात पाहून दुचाकी खरेदी करणे एकाला चांगलेच महागात पडले आहे. सायबर चोरट्यांनी दुचाकी खरेदीचे आमिष दाखवून 1 लाख 45 हजारांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हे सिंहगड रस्ता परिसरात राहायला असून, त्यांनी फेसबुकवर 21 हजार रुपयांना दुचाकी विक्रीची जाहिरात पाहिली होती. त्यानुसार त्यांनी संबंधिताला गाडी विकत घेणार असल्याचे सांगितले.
त्यानंतर सायबर चोरट्याने गाडी बुकिंगसाठी 2 हजार 150 रुपये ऑनलाइन स्वतःच्या बँकखात्यावर वर्ग करून घेतले. त्यानंतर काही दिवसांनी सायबर चोरट्याने तक्रारदाराला फोन करून गाडीचा गेटपास क्लिअर करण्यासाठी पाच हजार रुपये वर्ग करून घेतले. अशाच प्रकारे वेगवेगळी कारणे सांगून चोरट्याने त्यांच्याकडून दीड लाख रुपये वर्ग करून घेत फसवणूक केली. दुचाकी न देता गंडा घातला आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड तपास करत आहेत.
तुम्ही जर फेसबुकवरील किंवा इतर सामाजिक माध्यमावरील जाहिरात पाहून दुचाकी किंवा चारचारी बुक करत असल्यास खबरदारी घेणे गरजेचे आहे. अन्यथा सायबर चोरट्यांकडून तुमची फसवणूक होऊ शकते. विशेषतः जाहिरातीमध्ये अतिशय कमी किमतीतील गाडी नवीन असल्याचे भासवून नागरिकांना चोरट्यांकडून भुरळ पाडली जात आहे. त्यानंतर विविध कारणे सांगून ऑनलाइन पैसे पाठविण्यास भाग पाडले जात आहे.
हेही वाचा