Loksabha election | पवार कुटुंबीयातील कलगीतुरा कळसाला; प्रचाराची पातळी घसरली | पुढारी

Loksabha election | पवार कुटुंबीयातील कलगीतुरा कळसाला; प्रचाराची पातळी घसरली

सुहास जगताप

 बारामती लोकसभा मतदार संघातील पवार विरुद्ध पवार ही लढत आता वेगळ्याच वळणावर येऊन ठेपली आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत पवार घराण्यातच कलगीतुरा रंगला आहे. ईष्येने लढविल्या जाणाऱ्या निवडणुकीत परस्परांवरील जहरी टीकेचा कळसच झाला आहे.

बारामती ; पवारांच्या घरातील काका, पुतणे, आजोबा, असे आतापर्यंत एकमेकांची केवळ स्तुती करण्यासाठी तोंड उघडत, ते आता एकमेकांवर चांगलेच तोंडसुख घेत आहेत. एकमेकांवर अतिशय तिखट भाषेत कडवट टीका करू लागले आहेत. कोणताही मुलाहिजा न ठेवता बोलत आहेत. शिवराळपणाकडे झुकणारी टीका पवार कुटुंब जाहीरपणाने आता एकमेकांवर करू लागले असल्याने हे नवीनच प्रकरण मतदारांना या निवडणुकीत दिसत आहे, ही लढत खऱ्या अर्थाने ‘हाय व्होल्टेज’ झाली आहे,

शरद पवार ते अजित पवार असे कोणीच यामध्ये मागे राहण्यास तयार नाही. पवार कुटुंबातील सदस्यांमध्ये जणू आरोप-प्रत्यारोपांची स्पर्धाच लागल्यासारखी परिस्थिती बारामती लोकसभा मतदार संघात आहे. अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी प्रथम अजित पवारांना अतिशय शेलक्या भाषेत सुनावले, ‘वय झालेल्या व्यक्तीची आपण किंमत करत नाही. यासारखा नालायक माणूस नाही,’ अशा शब्दात त्यांनी टीकास्त्र सोडले.

अजित पवार पत्नीसाठी प्रचार करत आहेत. यावर टीका करताना सुप्रिया सुळेंनी ‘संसदेत खासदाराला जावं लागतं, खासदाराच्या पतीला तिथे प्रवेश नाही, त्याला बॅग सांभाळत कैटीनमध्ये बसावं लागतं, कोणी दादागिरी करत असेल तर जशास तसेच उत्तर मिळेल,’ अशी टीका केली. तर अजित पवार यांनी मग कहरच केला. त्यांनी आपल्या स्टाईलमध्ये सुप्रिया सुळे, शरद पवार आणि आपली भावंडे या सगळ्यांना उभे आडवे घेतले. ‘मी तोंड उघडलं तर फिरणं मुश्किल होईल. आदराने गप्प बसलो म्हणून वळवळ करू नका, गरागरा फिरणारी भावंडे या पावसाळ्यातल्या छत्र्या आहेत. एकदा मतदान झाले, की या छत्र्या परदेशात हवाई सफर करायला जातील, अशा नेमक्या शब्दांचा त्यांनी वापर केला.

पुतण्याचा काकांवर प्रहार

शरद पवार यांच्यावरही ते घसरले. निवडणुकीत भावनिक आवाहन करतील, ‘ शेवटची निवडणूक आहे असे म्हणतील, यांची शेवटची निवडणूक  कधी होणार, हे काय समजत नाही. बारामतीला चारदा मुख्यमंत्री पद मिळाले. अनेक मोठी पदे मिळाली; पण आता जशा मोठ्या योजनांची कामे बारामतीत चालू आहेत, तशी कधी झाली नाहीत. केंद्रात, राज्यात तुमची सत्ता आहे का ? सत्ता येण्याची शक्यता आहे का? मग पाण्याचा प्रश्न कसा सोडवणार?’ अशा शब्दांत मोठ्या पवारांना त्यांनी नामोहरम केले. तर ‘संसदेत केवळ भाषणे करून प्रश्न सुटत नाहीत, मी पण भाषणे करतो; पण त्याबरोबर काम करून जनतेला रिझल्टही देतो,’ असा बार त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केला. ‘अहो माझ्या रक्तातपण पवारांचेच जोन्स आहेत. शेवटी ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी, चार दिवस सासूचे तर चार दिवस सुनेचे असतात, आता दिवस सुनेचेच आहेत. त्यामुळे तुम्ही घरातच बसले पाहिजे,’ असा निशाणा त्यांनी शरद पवार यांच्यावर साधला.

रोहित पवार यांचे आव्हान

आमदार रोहित पवार तर आपल्या सर्वच भाषणात अजित पवारांच्या पक्षाचा ‘अजित पवार मित्र मंडळ’ आणि ‘मलिदा गैंग’ या शब्दात उल्लेख करतात. या गैंगने गुंडांचा वापर सुरू केला आहे, असा गंभीर आरोपी त्यांनी केला आहे. या गँगमध्ये एक एक कोटीच्या गाड्या असलेल्या कंत्राटदारांची भरती आहे. अजित पवारांनी भावांची नावे घेऊन काय प्रकरणे आहेत ते सांगावेच, सगळेच लोकांसमोर येऊ द्या. अजित पवार बोलतात ते सगळेच काय खरं नसतं,’ असा समाचार रोहित पवार यांनी घेतला आहे.

कोणालाच घाबरू नका: शरद पवार

‘कोणी दमबाजी करत असेल तर त्याला घाबरू नका, ने दमबाजी करत आहेत त्यांना त्या जागेवर मी बसवले आहे, त्यांना दुरुस्त करण्याची बेळ आता आली आहे. तुम्ही किती दम दिला, धमक्या दिल्या, तरी त्याला भीक न घालणारी ही औलाद आहे, ही औलाद कुणाही समोर झुकणार नाही, अशा शब्दांत मग शरद पवारांनी अजित पवारांना सुनावले आहे.

विरोधकांपेक्षाही जहरी टीका

बारामती लोकसभा मतदार संघात नेहमीच भाजप विरुद्ध पवार घराणे अशी लढत झालेली आहे. त्यावेळीसुद्धा भाजपच्या नेत्यांनी इतक्या चाईट शब्दांमध्ये शरद पवार किंवा त्यांच्या कुटुंबावर टीका केली नव्हती, त्यापेक्षा जास्त कठोर टीका आज पवारच एकमेकांच्या विरुद्ध करू लागलेले आहेत, भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे पवारांवर फार कठोर भाषेत टीका करण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांनीही प्रचार काळात बारामतीत अनेक सभा घेतल्या. परंतु, त्यांनीही कथी एवढ्या कठोर भाषेत पवारांवर टीका केली नव्हती, इतक्या कठोर आणि तिखट भाषेत आता पवारच एकमेकांच्या विरुद्ध बोलू लागले आहेत.

प्रचाराची पातळी घसरू लागली

बारामती मतदार संघातील प्रचाराची पातळी हळूहळू अतिशय खालच्या थराला जाऊ लागलेली आहे. पवार एकमेकांवर टीका करू लागल्याने कार्यकत्यांना काही समजेनासे झाले आहे. शरद पवारांचे कुटुंब प्रथमच अशा पेचप्रसंगाला सामोरे जात आहे आणि त्यातच शरद पवार यांची कन्या आणि अजित पवार यांची पत्नीच समोरासमोर उभ्या ठाकल्याने दोन्ही पवारांच्या राजकीय अस्तित्वाची ही लढाई झाली असून, ती निकराने लढण्याच्या तयारीत दोन्ही नेते असल्याने आगामी काळात या टीकेला आणखी धार येण्याची शक्यता आहे. हे दोन्ही पवार केव्हाही एकत्र येऊ शकतात आणि त्यावेळी आपला मात्र गेम होईल, असा एक सार्वत्रिक समज दोन्ही पवारांच्या गोटातील नेते, कार्यकर्ते यांच्यामध्ये आहे.

तो दूर करण्यासाठी आणि आम्ही पुन्हा कधीच एकत्र येणार नाही, हे कार्यकत्यांच्या मनावर पूर्णपणे ठसविण्यासाठीही पवारांना एकमेकांवर कठोर भाषेत टीका करणे अनिवार्य झाले आहे. पवार कुटुंबात कभी राजकीय युद्ध होईल, याची पुसटशीही कल्पना कधीच कोणाला नव्हती. आता त्या घराण्यात स्पष्टपणे फूट झालेली असल्यामुळे यापुढे निवडणूक काळामध्ये आणखी काय काय महाराष्ट्राला ऐकावे लागणार आहे, याचा अंदाज बांधत मोठ्या चर्चा सध्या मतदार संघामध्ये पडत आहेत. भाजपचे नेतेही या वाक्‌युद्धामुळे आश्चर्यचकित झाले आहेत, तर पवार विरोधक याची मजा चाखत आहेत. राजकारणात नेहमीच इतरांच्या झुंजी लावणारे आपापसात लढताना पाहून मतदार संघातील अनेकांना उकळ्या फुटत आहेत.

हेही वाचा

Back to top button