गडप्रेमींसाठी खुशखबर! किल्ले रायगडावर आता ४ रोपवे ट्रॉलींमधून होणार प्रवास

गडप्रेमींसाठी खुशखबर! किल्ले रायगडावर आता ४ रोपवे ट्रॉलींमधून होणार प्रवास

नाते; इलियास ढोकले : किल्ले रायगडावर आबाल वृद्धांसाठी सुरू असलेल्या रोपवे प्राधिकरणाने २३ एप्रिल श्री हनुमान जयंती पासून आपल्या नियमित ट्रॉलीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता तीन ऐवजी चार रोपवे ट्रॉली मधून प्रत्येकी सहा नुसार २४ शिवभक्तांचा प्रवास होणार आहे. ही सेवा श्री हनुमान जयंती पासून लोकार्पित होईल, अशी माहिती रोपवे प्राधिकरणाच्या व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.

रायगडावर जाण्यासाठी लहान मुले व अबाल वृद्धांना होणारा शारीरिक त्रास लक्षात घेऊन हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर जाण्यासाठी केंद्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाच्या परवानगीने ३ एप्रिल १९९६ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक राजेंद्रसिंह यांच्या हस्ते रोपवे सेवा लोकार्पित करण्यात आला होता. या रोपवे अर्थात रज्जूरथ कार्यामध्ये आता एका ट्रॉलीची वाढ करण्यात आली असून आता एका वेळेला दोन्ही दिशेने चार ट्रॉली मधून २४ शिवभक्तांचा प्रवास होणार आहे. रायगड रोपवे प्रशासनाकडून दिलेल्या माहितीनुसार, चौथ्या ट्रॉलीच्या आवश्यक असलेल्या सर्व तांत्रिक चाचण्या शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात आल्या आहेत. या सर्व चाचण्या झाल्यानंतर चौथ्या ट्रॉलीला परवानगी मिळाली आहे.

सध्या पाचाड येथील हिरकणीवाडी येथून अप्पर स्टेशन येथे जाण्यासाठी साडेचार ते पाच मिनिटांचा कालावधी लागतो या रोपवे मार्फत जाण्यासाठी शिवभक्तांना ३१० रूपये रिटर्न तिकीट उपलब्ध आहे. लहान मुलांसाठी तीन फुटापर्यंत उंचीच्या बालकांना मोफत सेवा देण्यात येत असून तीन ते चार फूट उंचीच्या बालकांना अर्ध्या तिकिटात तर सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना १९० रूपये रिटर्न तर सिंगल १३० रूपये तर आठवीच्या पुढे २२५ रू. रिटर्न व १९० रू. सिंगल अशा पद्धतीने आकारणी केली जाते. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सवलत दोनशे रुपयापर्यंत कमी करण्यात आली असून अपंगांसाठी ही सेवा मोफत दिली जाते.

रोपवे सुरू झाल्यापासून आज पर्यंत शिवभक्तांच्या सुरक्षिततेचा भाग म्हणून रोपवे प्रशासनाने विमा कवच देत आहे. या ठिकाणी तिकीट विक्रीच्या वळी येणार्‍या शिवभक्तांना दहा मिनिटांची किल्ले रायगड कसा व का पाहावा या संदर्भातील फिल्म व म्युझियमची माहिती दिली जाते. देशातील शिवभक्तांना किल्ले रायगडावर येण्यासाठी आता ऑनलाइन सुविधा उपलब्ध असून याकरिता 'रायगड रोपवे डॉट कॉम'वर जाऊन तिकिटे निश्चित करू शकता.

मागील काही वर्षापासून किल्ले रायगडावर जाणाऱ्या शिवभक्तांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली असून दररोज ५०० ते ७०० शिवभक्त गडावर जातात. रायगडावर तसेच पायथ्याशी रोपवे प्रशासनामार्फत न्याहारी व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या निर्देशानुसार आता किल्ले रायगडावर रात्रीचा मुक्काम करण्यास प्रतिबंध करण्यात आल्याने सायंकाळी उशिरापर्यंत ही रोपवे सेवा सुरू असते, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news