कर्मचार्‍यांनी निवडणूक हलक्यात घेऊ नये : जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसेंचा इशारा | पुढारी

कर्मचार्‍यांनी निवडणूक हलक्यात घेऊ नये : जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसेंचा इशारा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीसाठी कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यातून आरोग्य, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, बँका, जलसंपदा विभाग, परीक्षा प्रक्रियेत सहभागी असलेले प्राध्यापक, शिक्षक आदी अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचार्‍यांना वगळण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी स्पष्ट केले. चारही मतदारसंघातील नियुक्त कर्मचार्‍यांपैकी 10 टक्के म्हणजेच सुमारे सहा हजार कर्मचार्‍यांनी प्रशिक्षणासाठी दांडी मारली आहे, त्यांनी हलक्यात घेऊ नये, असा इशारा त्यांनी मंगळवारी दिला.
निवडणूक कामकाज आढाव्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी डॉ. दिवसे बोलत होते. ते म्हणाले, जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकांच्या कामांसाठी नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका, बँका तसेच राज्य आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विविध कार्यालयांमधील कर्मचारी नियुक्त केले आहेत. कर्मचार्‍यांना पहिले प्रशिक्षण देण्यात आले. दुसरे प्रशिक्षण लवकरच देण्यात येईल. अनुपस्थित कर्मचार्‍यांना नोटिसा पाठविण्याची कारवाई करणार आहे.
दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळता इतर शासकीय विभागांमध्ये कार्यरत असणारे अधिकारी, कर्मचारी यांना खरोखरीच आरोग्यविषयक त्रास, शारीरिक व्याधी किंवा पूर्वनियोजित कामासाठी बाहेरगावी किंवा  परदेशात जायचे असल्यास अशा कर्मचार्‍यांची शहानिशा करून त्यांना वगळण्यात येईल. आतापर्यंत कोणत्याही कर्मचार्‍याला निवडणूक कामकाजातून वगळण्यात आल्याचे आदेश काढण्यात आलेले नाहीत किंवा संबंधित कर्मचार्‍यांना तसे सांगण्यात आलेले नाही, असेही जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा

Back to top button