कोल्हापूर : कॉलेज तरुणीला ब्लॅकमेल करून जीवे मारण्याची धमकी | पुढारी

कोल्हापूर : कॉलेज तरुणीला ब्लॅकमेल करून जीवे मारण्याची धमकी

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कॉलेज तरुणीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अश्लील मेसेज पाठवून तसेच नग्न फोटो पाठविण्यासाठी जीवे मारण्याची धमकी देणार्‍या गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथील नराधमाला शाहूपुरी पोलिसांनी मंगळवारी अटक केली. अमरनाथ कृष्णा दप्तरदार (वय 22) असे त्याचे नाव आहे. शाहूपुरी व सायबर पोलिसांनी सापळा रचून नागाळा पार्क येथे संयुक्त कारवाई केली. संशयिताला न्यायालयाने 18 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

पोलिस सूत्राकडून सांगण्यात आले की, पीडित तरुणी आणि संशयित तरुण दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेतात. संशयिताने त्या तरुणीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अश्लील मेसेज पाठवले. या घटनेने भेदरलेल्या तरुणीने घरी कुटुंबीय, नातेवाईकांना माहिती दिली. संबंधितांनी तरुणाची भेट घेऊन समजूत काढली. पण त्याचे कारनामे थांबले नाहीत. त्यानंतरही त्याने इन्स्टा अकाऊंटवरून अश्लील मेसेज पाठवून तिला बदनाम करण्याचा प्रकार सुरूच ठेवला. नराधमाने तरुणीला नग्न फोटो पाठविण्यासाठीही तगादा लावला. फोटो पाठविले नाहीस तर जीवे मारण्याची त्याने धमकी दिली. या त्रासाला वैतागलेल्या तरुणीने अखेर शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजयकुमार सिंदकर व सायबर पोलिस ठाण्याशी संपर्क साधून कैफियत मांडली.

पोलिसांच्या सूचनेनुसार तरुणीने नराधमाला भेटण्यासाठी नागाळा पार्क येथील आईस्क्रीम पार्लरमध्ये बोलावून घेतले. तेथे पोलिसांनी सापळा रचून त्यास अटक केली. या कारवाईत पोलिस निरीक्षक सिंदकर, तानाजी चौगुले, निर्भया पथकातील नंदा सुतार, मनीषा गुरव, मनीषा मोंगल सहभागी झाले होते.

Back to top button