जलसंकटाचे सावट : राज्यातील धरणांमध्ये उरला 33 टक्केपाणीसाठा | पुढारी

जलसंकटाचे सावट : राज्यातील धरणांमध्ये उरला 33 टक्केपाणीसाठा

शिवाजी शिंदे

पुणे : राज्यात एप्रिल महिन्यात उन्हाच्या चटक्याबरोबरच पाणीटंचाईच्या झळा अतिशय तीव्र झाल्या आहेत. एकूण धरणांपैकी सुमारे 31 जलसाठे कोरडेठाक पडले आहेत; तर बहुतांश धरणांमधील पाणीसाठा 10 टक्क्यांंपेक्षा कमी शिल्लक राहिला आहे. सध्या एकूण सर्वच धरणात सध्या केवळ 33.33 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच दिवसांत 41.65 टक्के पाणीसाठा शिल्लक होता.
दरम्यान मागील वर्षीपेक्षा सुमारे 9.32 टक्क्यांनी पाणीसाठा कमी आहे. पाण्याची स्थिती एकूणच अत्यंत गंभीर बनली असून उरलेल्या धरणामधील पाण्याचे व्यवस्थापन व्यवस्थित करणे गरजेचे आहे. पाणीटंचाईच्या झळांचा फटका नागपूर, धाराशिव, लातूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती या भागातील धरणांना जास्त बसला आहे.

राज्यात मागील तीन ते चार वर्षापेक्षा यावर्षी सरासरीपेक्षा जास्त उन्हाचा चटका वाढला आहे. कमाल तापमानाचा पारा ऐन एप्रिल महिन्यात 42 अंशाच्या पुढे गेला आहे. तर किमान तापमानही 25 ते 30 अंशांच्या आसपास आहे. कडक उन्हामुळे धरणामधील पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे प्रमाणही वाढले आहे. परिणामी मे तसेच जून महिन्यात राज्यात जलस्थिती बिकट होण्याची शक्यता नाकारता येत आही. ही बाब लक्षात घेऊन पाण्याची बचत करणे गरजेचे आहे. अन्यथा राज्याला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
राज्यात मागील वर्षी एप्रिल महिन्याच्या दुसर्‍या टप्प्यात 41.65 टक्केपाणीसाठा होता. यावर्षी मात्र हाच पाणीसाठा 33.33 टक्क्यांवर आला आहे. मागील वर्षीच्या टक्केवारीच्या तुलनेत तो 9.32 टक्क्यांनी कमी आहे.

जलसंपदा विभागाच्या अंतर्गत नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे आणि कोकण असे सहा विभाग आहेत. या सहा विभागात मिळून एकूण 2 हजार 994 एवढी धरणे आहेत. मात्र या सर्वच धरणांतील साठा गेल्या काही महिन्यांपासून झपाट्याने कमी होत आहे. कायमच दुष्काळी असलेल्या मराठवाड्यातील धाराशिव, लातूर तसेच बीड जिल्ह्यातील धरणांमधील साठा पूर्णपणे संपला आहे. त्यामुळे या भागातील काही धरणांचा अपवाद वगळता पूर्णपणे कोरडी पडली आहेत. सधन असलेल्या पुणे विभागात मागील वर्षी पावसाने चांगलीच ओढ दिली. त्यामुळे या विभागातील पुण्यासह सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांत पाण्याच्या झळा जाणवू लागल्या आहेत.

त्यातही उजनी धरणाचा पाणीसाठा पूर्णपणे तळाला गेला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश भागांस पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. नागपूर आणि अमरावती विभागात राज्यातील इतर विभागापेक्षा काही प्रमाणात मोठा साठा असलेली धरणे आहेत. मात्र या भागातील धरणांतील पाणीसाठाही चाळीस टक्क्यांपेक्षा खाली घसरला आहे. कोकण भागात असलेल्या धरणांमधील पाणीसाठाही खालावला असून स्थिती गंभीर झाली आहे.

राज्यात जलसाठ्याचा सर्वाधिक फटका छत्रपती संभाजीनगर भागाला बसला आहे. या भागात सध्या 16.49 टक्के एवढा जलसाठा आहे. या भागात मागील वर्षी एप्रिल महिन्याच्या दुसर्‍या टप्प्यात 42.08 टक्के एवढा पाणीसाठा होता. त्या खालोखाल पुणे विभागालाही पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. या भागात सध्या केवळ 31.06 टक्के साठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच काळात या भागात 38.71 टक्के पाणीसाठा होता. सध्या नागपूर 44.21 टक्के, अमरावती 46.31, नाशिक 34.76 व कोकण 46.66 टक्के पाणीसाठा उरला आहे. धरणात असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करणे हे शासनासमोर एक मोठे आव्हान आहे.

  • धाराशिव, लातूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती,
  • नागपूर भागातील धरणांच्या पाणीसाठ्यांनी गाठला तळ
  • मागील वर्षी एप्रिल महिन्यात होता 41.65 टक्केपाणीसाठा
  • मागील वर्षीपेक्षा यावर्षी सुमारे 9.32 टक्क्यांनी पाणीसाठ्यात घट
  • पुढील दोन महिने पाण्याचे व्यवस्थापन करण्याचे शासनासमोर आव्हान

हेही वाचा

Back to top button