Loksabha election 2024 | शिरूरला बिबट्याचा प्रश्न ऐरणीवर!

Loksabha election 2024 | शिरूरला बिबट्याचा प्रश्न ऐरणीवर!

शिवनेरी : शिरूर लोकसभा मतदारसंघात बिबट्या आणि मानवाचा संघर्ष दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालला आहे. गेल्या पाच वर्षांत जुन्नर उपवन विभाग क्षेत्रात 12 मनुष्य आणि 13 हजार 775 जनावरांचा बिबट्याने बळी घेतला आहे. यामुळेच यंदाच्या लोकसभा निवडणूक प्रचारात बिबट्याचा प्रश्न महत्त्वाचा ठरणार असून, उमेदवारांना ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे. लोकसभा निवडणूक प्रचारात अद्यापही मतदारसंघातील प्रश्नांवर उमेदवारांकडून चर्चा होताना दिसत नाही. शिरूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे विरुद्ध माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा सामना होत असून, दोन्ही उमेदवारांकडून मतदारसंघातील प्रश्न घेऊन प्रचार करणे अपेक्षित असताना सध्या केवळ वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

दोन दिवसांपूर्वी शिरूर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर तालुक्यातील एका गावात बिबट्याने दीड वर्षाच्या मुलीवर हल्ला करून तिला ठार केले. भविष्यात मानवाचा बिबट्यांबरोबरचा संघर्ष अधिक तीव्र होत जाणार आहे. यासाठी आता मानवावर होणारे बिबट्याचे हल्ले तातडीने थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. यामध्ये बिबट्यांची झपाट्याने वाढणारी संख्या नियंत्रणात आणली नाही, तर शिरूर लोकसभा मतदारसंघापुरता मर्यादित असलेला बिबट्यांच्या संख्येचा विस्फोट होऊन संपूर्ण राज्यात मानवाला फार मोठी किंमत मोजावी लागेल. बिबटे मानव व पाळीव प्राणी यांच्यातील संघर्ष थांबविण्यासाठी बिबट्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण हाच एकमेव प्रभावी उपाय असून, त्यासाठी केंद्र शासनस्तरावर योग्य धोरण निश्चित करावे लागेल आणि यासाठी शिरूर लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांना ठोस भूमिका घ्यावी लागेल, हे नक्की.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news