Lok Sabha Election 2024 | नांदेड: ४३ हजार ‘फर्स्ट वोटर्स’वर प्रमुख उमेदवारांची नजर | पुढारी

Lok Sabha Election 2024 | नांदेड: ४३ हजार ‘फर्स्ट वोटर्स’वर प्रमुख उमेदवारांची नजर

विश्‍वास गुंडावार

नांदेड:  लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्यातील एकूण 27 लाख 46 हजार 671 मतदार असून यामध्ये पुरुष 13 लाख 46 हजार 477 व स्त्री 13 लाख 8 हजार 36 मतदारांची नोंद आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच मतदान करणार्‍यांची संख्या 43 हजार 322 आहे. यामध्ये पुरुष 26 हजार 506 आणि स्त्री 16 हजार 811 मतदारांची नोंद आहे. विशेष म्हणजे तरुण मतदारांची संख्या देखील लक्षणीय असल्याने तरुण आणि नवमतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजप – काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांनी वेगवेगळी व्यूहरचना आखली आहे. Lok Sabha Election 2024

लोकसभा निवडणुकीची अधिसूचना जारी होऊन आचारसंहिता लागू झाली आहे. या दृष्टीने राजकीय पक्षांसह जिल्हा प्रशासनही सज्ज झाले आहे. अधिकार्‍यांच्या नेमणुका करून झाल्यानंतर बूथवरील अधिकारी, कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण अंतिम टप्प्यात आहे. जिल्हा प्रशासनाकडून मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर यामधील आकडेवारी बाहेर आली आहे. नवमतदार व तरुण मतदारांची संख्या पाहता राजकीय पक्ष या मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवत आहेत. Lok Sabha Election 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमीच आपल्या भाषणामध्ये तरुण वर्ग हा देशाचे भविष्य असल्याचे सांगत असतात त्यामुळे सुरुवातीपासून भाजपची नजर या मतदारांवर असल्याचे स्पष्ट होते. काँग्रेसचे नेते राहूल गांधी हे देखील आपल्या भाषणातून युवा, बेरोजगारी याविषयी बोलत असतात. त्यामुळे 18-19 वयोगटातील पहिल्यांदाच मतदार करणारे व 22 ते 29 या वयोगटातील तरुण मतदारांवर राजकीय पक्षांचे विशेष लक्ष आहे. नांदेड जिल्ह्यातील 9 तालुक्यात मिळून 85 वर्षापेक्षा अधिक वय असलेले 38 हजार 001 मतदार आहेत. यामध्ये पुरूष 14 हजार 374 तर स्त्री 23 हजार 627 मतदारांचा समावेश आहे.

याशिवाय जिल्ह्यात एकूण 22 हजार 358 अपंग मतदार असून यामध्ये पुरुष 13 हजार 290 व स्त्री 9 हजार 062 मतदारांची नोंद आहे.
तृतीयपंथी मतदारांची संख्या जिल्ह्यात 164 आहे याशिवाय पहिल्यांदाच मतदान करणार्‍यांमध्ये 5आणि अपंग 6 तृतीयपंथी मतदार आहेत.

हेही वाचा 

Back to top button