Manchar : शेतीपंपाच्या भारनियमनात सुधारणा करा; अन्यथा आंदोलन | पुढारी

Manchar : शेतीपंपाच्या भारनियमनात सुधारणा करा; अन्यथा आंदोलन

मंचर : पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव, शिरूर तालुक्यांतील शेतीपंपाचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. वीजपुरवठा सुरळीत करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मंचर महावितरण कार्यालयासमोर सोमवारी (दि. 15) दुपारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. शेतीपंपाच्या वीज भारनियमनाबाबत 15 दिवसांमध्ये परिस्थिती सुधारली नाही, तर दि. 1 मेपासून आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांनी दिला.
आंबेगाव, शिरूर तालुक्यांतील शेतीपंपाचा वीजपुरवठा सुरळीत करावा, वाढलेले भारनियमन कमी करावे तसेच शेतीला दिवसा वीजपुरवठा व्हावा, या मागण्यासाठी महावितरण कंपनीला निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर वरील मागण्यासाठी मंचर येथील महावितरणच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

या वेळी माजी सरपंच बाळासाहेब बाणखेले, धोंडीभाऊ भोर, गणेश यादव, दादाभाऊ थोरात, पूजा वळसे पाटील, संजय बढेकर, भरत मस्के, स्वप्निल बांगर, कुणाल बाणखेले, नवनाथ करंडे, बाबाजी इंदोरे, शंकर पिंगळे, मंगेश टेमकर, दौलत भोर, बंडेश वाघ, विशाल वाबळे आदी शेतकरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या. देवदत्त निकम म्हणाले मार्च, एप्रिल महिन्यांमध्ये पूर्वकल्पना न देता शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित केला जातो. या संदर्भात पाठपुरावा करूनही त्याची दखल घेतली गेली नाही. आम्ही निवेदन देऊन इशारा दिल्यानंतर काही प्रमाणात भारनियमन कमी झाले आहे. हा शेतकरी एकजुटीचा निम्मा विजय आहे. मात्र, शेतकर्‍यांची पिके पाण्याअभावी जळू लागली आहेत.

शेतीपूरक व्यवसायाला फटका बसला आहे. बळीराजा आता अन्याय सहन करणार नाही, असे सांगून बिबट प्रवण क्षेत्रात शेतीसाठी दिवसा अखंडित वीज मिळाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. या वेळी पूजा वळसे पाटील, दादाभाऊ थोरात, दादाभाऊ करंडे, हेमंत करंडे, मंगेश टेमकर आदींनीदेखील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान, महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता शांताराम बांगर यांची शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली व समस्या समजावून घेतल्या. त्या वेळी आपले म्हणणे वरिष्ठांच्या कानावर घातले जाईल, असे बांगर यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button