अस्वच्छ टाक्यांतून; अशुद्ध पाणीपुरवठा : नागरिकांच्या आरोग्याला धोका | पुढारी

अस्वच्छ टाक्यांतून; अशुद्ध पाणीपुरवठा : नागरिकांच्या आरोग्याला धोका

धायरी : पुढारी वृत्तसेवा : सिंहगड रस्त्यालगतचे नर्‍हे गाव पुणे महापालिकेत समाविष्ट होऊन तीन वर्षे झाली, तरीही येथील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या अद्याप साफसफाई करून स्वच्छ करण्यात आलेल्या नाहीत. ग्रामपंचायत काळात या टाक्या कधी धुऊन साफ करण्यात आल्या होत्या, याची माहिती उपलब्ध होत नाही. त्यामुळे या टाक्या अस्वच्छ होऊन शेवाळयुक्त झाल्या आहेत. तसेच, टाक्यांमध्ये गाळ साठला आहे. यामुळे संपूर्ण गावाला अशुद्ध पाणीपुरवठा होेत आहे.

नर्‍हे गावठाणात (दीड लाख लिटर), मानाजीनगर मारुती मंदिर (पन्नास हजार लिटर), नवस्करवस्ती (दोन लाख लिटर), तक्षशिला सोसायटी (वीस लाख लिटर), दरोडे जोग (तीन लाख लिटर) या टाक्यांमधून महापालिकेच्या वतीने संपूर्ण नर्‍हेगावाला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या टाक्या साफ न केल्याने मातीमिश्रित पाणी नळाला येत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. नर्‍हे गावची लोकसंख्या दोन लाखांच्या आसपास झाली आहे.

गाव विस्तारत असल्यामुळे लोकसंख्येतही झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने या टाक्या साफ न केल्यामुळे तीन वर्षांपासून नर्‍हेगावाला अशुद्ध पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. येथील रहिवाशांना अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्यामुळे उलट्या, जुलाब, पोटदुखी, हिवताप इत्यादी आजारांची लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या टाक्या त्वरित धुऊन साफ कराव्यात, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत.

महापालिकेत गाव समाविष्ट झाल्यापासून गावात असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या साफ करण्यात आलेल्या नाहीत. याबाबत महापालिका संबंधित विभागाला निवेदन देऊन सांगण्यात आले आहे.

– संपत वाल्हेकर, ग्रामस्थ, नर्‍हेगाव

ग्रामपंचायत काळात वर्षातून दोन-तीनदा या पाण्याच्या टाक्या साफ करण्यात येत होत्या. परंतु, महापालिकेत हे गाव समाविष्ट केल्यानंतर तीन वर्षे झाली, तरी पिण्याच्या पाण्याच्या टाक्या धुऊन साफ करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे येथील नागरिकांत पोटात मळमळणे, साथीच्या आजारात लक्षणीय वाढ झाली आहे. नळाला येणार्‍या पाण्याला दूषित वास येत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या वतीने त्वरित या टाक्या साफ करून घेण्यात याव्यात; अन्यथा येथील नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

– विजय वाघमारे, पुजारी, नर्‍हेगाव

याबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्या आहेत. या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या त्वरित साफ करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.

– दीपक रोमन, कनिष्ठ अभियंता, पाणीपुरवठा विभाग, पुणे मनपा

हेही वाचा

Back to top button