विलासराव जगताप यांचा भाजपला ‘राम राम’ | पुढारी

विलासराव जगताप यांचा भाजपला ‘राम राम’

जत शहर; पुढारी वृत्तसेवा : सांगली लोकसभेसाठी सुरुवातीपासून खा. संजय पाटील यांना विरोध करणारे भाजपचे नेते माजी आ. विलासराव जगताप यांनी थेट भाजपचा राजीनामा देत काँग्रेसच्या विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. जगताप यांच्यासह भाजपचे तालुका अध्यक्ष प्रमोद सावंत, युवा मोर्चाचे जिल्हा नेते संग्राम जगताप, जत शहराध्यक्ष आण्णा भिसे, राजू डफळे, लक्ष्मण बोराडे, राजू चौगुले आदींनी सामूहिक राजीनामे दिले आहेत.

दरम्यान, विलासराव जगताप यांनी निर्णय जाहीर केल्यानंतर दुष्काळी फोरम दोन दिवसात विशाल पाटील यांच्या प्रचारात सक्रिय दिसेल, असा दावा त्यांनी केला. विशाल पाटील मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी खा. संजय पाटील यांची राजकारणातील गद्दारी जाहीरपणे समर्थक कार्यकर्त्यांसमोर मांडली.
जगताप यांच्या निर्णयानंतर मात्र सांगली लोकसभेसाठी आता चांगलीच चुरस वाढली आहे. खासदार संजय पाटील व विलासराव जगताप यांच्यातील मतभेद गेल्या काही वर्षापासून टोकावर गेले होते. खासदार संजय पाटील यांनीच मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत जगताप यांना अंतर्गत धक्का दिल्याचा आरोप जगताप गटाने त्यांच्यावर केला होता. त्यामुळे या दोघांमध्ये मतैक्य होण्याऐवजी ही दरी वाढतच गेली. त्याचे पडसाद आता लोकसभेच्या निवडणुकीत दिसून येत आहेत

सांगली लोकसभेसाठी संजय पाटील यांना भाजपने उमेदवारी देऊ नये, अशी थेट मागणी माजी आमदार विलासराव जगताप यांनी केली होती. परंतु तरीही पक्षश्रेष्ठींनी तिसर्‍यांदा संजय पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तेव्हापासून जगताप हे पक्षावर नाराज होते. त्यामुळे जगताप कोणती भूमिका घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. अखेर सोमवारी जतमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेऊन जगताप यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे. या बैठकीला तालुक्यातून जगताप गटाचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

साहेब बांधतील ते तोरण…

जत तालुक्यात विलासराव जगताप यांचा आजही स्वयंभू असा गट आहे. जिकडे साहेब तिकडे आम्ही, असे म्हणणार्‍या जगताप समर्थकांनी, साहेब घेतील ते धोरण.. बांधतील ते तोरण.. म्हणत पाठिंबा दिला.

पदाधिकारी अनुपस्थित

माजी आमदार जगताप यांनी बोलावलेल्या बैठकीला भाजपचे डॉ. रवींद्र आरळी, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, भाजपा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवी पाटील, प्रभाकर जाधव, अ‍ॅड. श्रीपाद अष्टेकर, संजय तेली, शिवाप्पा तावशी, चंद्रकांत गुड्डोडगी, माजी सभापती आकाराम मासाळ, माजी सभापती आर. के. पाटील, आप्पासाहेब नामद, रामण्णा जीवान्नावर, मोहन कुलकर्णी, रवींद्र सावंत, दिग्विजय चव्हाण, विठ्ठल निकम ,आर. के पाटील, सिद्धणा राचगोंड, गिरमला रगटे, रेवप्पा पट्टणशेट्टी, चिदानंद चौगुले हे पदाधिकारी अनुपस्थित होते.

Back to top button