’उजनी’तील पळसनाथ मंदिर विनामूल्य पाहता येणार..! | पुढारी

’उजनी’तील पळसनाथ मंदिर विनामूल्य पाहता येणार..!

पळसदेव : पुढारी वृत्तसेवा : उजनी (यशवंत सागर जलाशय) धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे उघड्या पडलेल्या पळसनाथ (ता. इंदापूर) मंदिराला पाहण्यासाठी भाविकांसह पर्यटकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. भाविक, पर्यटकांना पाण्यातील मंदिरापर्यंत नेण्यासाठी येथील मच्छीमार अत्यल्प कमी दरात होडीची सेवा देत आहेत. मात्र, पळसनाथ यात्रेनिमित्त रविवार (दि. 14) पासून येणार्‍या भाविक, पर्यटकांना विनामूल्य होडी सेवा देण्याचा निर्णय मच्छीमारांनी घेतला आहे. मच्छीमारांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

उजनी धरण परिसरात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होते, त्यावेळी धरणाच्या तळाशी गेलेले जुन्या पळसनाथ मंदिरासह, राजवाडे, पूल उघडे पडतात व ते पाहण्याचा दुमीर्र्ळ योग भाविकांसह पर्यटकांना येतो. त्यामुळे राज्याच्या कानाकोपर्‍यातून अनेक भाविक, पर्यटक हे मंदिर पाहण्यास येथे येत असतात. एरव्ही सोमवार ते शुक्रवारपर्यंत शेकडोच्या संख्येने येणारे भाविक, पर्यटक सुटीच्या दिवशी म्हणजेच शनिवार आणि रविवारी 250 ते 300 हून अधिक असतात.

दरम्यान, धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने येथील स्थानिक मच्छिमारांचा मासेमारी व्यवसाय पुरता बंद पडल्यातच जमा आहे. त्यामुळे अनेक मच्छिमारांनी भाविक, पर्यटकांना धरणाचा काठ ते पळसनाथ मंदिरापर्यंत होडीतून अत्यल्प दरात नेण्यास सुरुवात केली, त्यामुळे भाविक, पर्यटकांची देखील सोय होत आहे. दरम्यान पळसनाथ देवाची यात्रा असल्याने रविवारपासून धरणातील मंदिर पाहण्यासाठी येणार्‍या भाविक पर्यटकांना विनामूल्य होडीची सेवा देण्याचा निर्णय सर्व मच्छिमारांनी घेतला असल्याची माहिती कांतिलाल नगरे, लाला मुलाणी, भीमराव भोई, युवराज नगरे, नवनाथ नगरे यांनी दिली. त्याचा मोठ्या संख्येने भाविक, पर्यटकांनी लाभ घेतला.

हेही वाचा

Back to top button