बिजवडी परिसरात डेंग्यूची साथ : नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन | पुढारी

बिजवडी परिसरात डेंग्यूची साथ : नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : बिजवडी, पोंदकुलवाडी (ता. इंदापूर) परिसरात डेंग्यूची साथ पसरू लागली आहे. गेल्या काही दिवसांत डेंग्यूचे रुग्ण वाढू लागले आहेत. तर प्राथमिक आरोग्य केंद्राकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. शक्यतो पावसाळ्यात होणारा आजार हा अचानक उन्हाळ्यात झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. सध्या बिजवडी गाव परिसरात डेंग्यूच्या 9 रुग्णांची नोंद आहे. मात्र, त्याहून जास्तीचे रुग्ण आढळण्याची शक्यता आहे. खासगी तसेच शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्यासाठी डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.

दरम्यान, डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे जनजागृती केली जात आहे. शनिवारी (दि. 13) 10 जणांचे पथक तयार करून ते घरोघरी साठवलेल्या पाण्याची भांडी तपासणी करत आहेत. गावातील सोशल मीडियावर ग्रुपवर डेंग्यूबाबत जनजागृतीचे व्हिडिओ पाठविण्यात आले आहेत. गावात धुरळणी तसेच पिण्याच्या पाण्यामध्ये टीसीएल पावडर टाकण्याची व्यवस्था करण्याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला कळविण्यात आले आहे. नागरिकांनी खबरदारी घेत डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यास मदत करावी, असे आवाहन बिजवडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुश्रुत शहा यांनी केले आहे.

हेही वाचा

Back to top button