विद्यार्थ्यांसोबत कुलगुरूंचाही अभ्यास : पुणे विद्यापीठात ’18 तास अभ्यास अभियान’ | पुढारी

विद्यार्थ्यांसोबत कुलगुरूंचाही अभ्यास : पुणे विद्यापीठात ’18 तास अभ्यास अभियान’

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयाला मोठा वारसा असून, येथून खूप मोठी माणसं घडलेली आहेत, अशा या वास्तूत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सलग 18 तास अभ्यास करण्याचा राबविला जात असलेला उपक्रमात स्तुत्य आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी केवळ एक दिवस नाही, तर वर्षभर या अभ्यासात सातत्य ठेवावे, असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी शनिवारी केले. तसेच, कुलगुरूंनी स्वत: काही तास ग्रंथालयात विद्यार्थ्यांबरोबर बसून अभ्यास केला.

विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पोस्ट- ग्रॅज्युएट स्टुडन्ट्स असोसिएशनतर्फे (डाप्सा) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘18 तास अभ्यास अभियाना’च्या उद्घाटनप्रसंगी डॉ. सुरेश गोसावी बोलत होते. या वेळी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. अभिजित कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सदानंद भोसले आदी उपस्थित होते.

डॉ. गोसावी म्हणाले, मी स्वत:ला विद्यार्थीच समजतो. तसेच, विद्यार्थी म्हणून आपण एकमेकांकडून काही शिकत असतो. बर्‍याचदा मोबाईलमुळे आपले लक्ष विचलित होते. त्यामुळे सलग 18 तास अभ्यास करत असताना किती तास मोबाईल बंद ठेवतो यालाही महत्त्व आहे. आपल्याला काही उद्दिष्टे पूर्ण करायची असतील, तर एक प्रेरणा घेऊन अभ्यास करणे गरजेचे आहे. डॉ. खरे म्हणाले, येथे 18 तास अभ्यास करून विद्यार्थ्यांनी निश्चितच त्यांचे ध्येय प्राप्त करावे. मात्र, या अभ्यासातून निर्माण होणार्‍या ऊर्जेचा वापर ते समाजासाठी करत नाहीत तोपर्यंत त्याचा उपयोग होणार नाही. या कार्यक्रमाचे संयोजन डाप्सा संघटनेचे अध्यक्ष अमोल सरोदे यांच्यासह सागर सोनकांबळे यांनी केले. कार्यक्रमात डॉ. विलास आढाव, डॉ. सदानंद भोसले, डॉ. सुनील धिवार आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. किरण भद्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

हेही वाचा

Back to top button