वालचंदनगर : पुढारी वृत्तसेवा : अंथुर्णे (ता. इंदापूर) येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार दत्तात्रय भरणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्याला दमदाटी केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनला. या घटनेनंतर परिसर संवेदनशील बनल्याने पोलिसांनी मतदान केंद्रावर औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांचे पथक तैनात केले होते. या व्हिडीओमुळे बारामती लोकसभा मतदारसंघातील वातावरण चांगलेच तापले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, मंगळवारी मतदान प्रक्रिया सुरू असताना सकाळी दहाच्या सुमारास मतदान केंद्राबाहेर ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी सुप्रिया सुळे गटाचे कार्यकर्ते नाना गवळी हे मतदारांशी संवाद साधत होते.
त्या वेळी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना गवळी हे लोकांना पैसे वाटप करत असल्याचा संशय आल्याने कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जाब विचारण्यासाठी गर्दी केली. तेवढ्यात आमदार भरणे मतदान केंद्रास भेट देण्याच्या निमित्ताने तेथे आले असता, त्यांना गर्दी दिसल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. भरणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन करून सुळे गटाचे कार्यकर्ता नाना गवळी यांना तेथून निघून जाण्याचा आग्रह धरत दमदाटी केल्याचा प्रकार घडला.
या घटनेबाबत आमदार भरणे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, नाना गवळी हा बारामती अॅग्रो कारखान्याचा कर्मचारी मतदान केंद्राबाहेर पैसे वाटप करत असताना आमच्या कार्यकर्त्यांनी त्यास घेराव घातला होता. सुदैवाने आपण त्या ठिकाणी पोहोचल्याने तेथील कार्यकर्त्यांना आपण शांत केले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या वेळी त्याने मतदारांना नोकरीला लावण्याचे खोटे आमिष दाखवल्याची बाब समोर आल्याने मला राग येऊन मी त्यास ग्रामीण भाषेत खवळलो.
याबाबत नाना गवळी यांना संपर्क साधला असता, आपण कोणासही एक रुपयाही वाटला नाही. मी ग्रामपंचायत कर्यालयासमोर लोकांशी बोलत उभा होतो. आमच्या बूथवर लोकांची मोठी गर्दी होती. तेवढ्यात आमदार भरणे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी बूथवरील गर्दी पाहून चिडून जाऊन मला विनाकारण अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत दमदाटी केली. या सर्व प्रकारात मी आमदार भरणे यांना एक शब्दही उलट बोललो नाही. उलट त्यांच्यासोबत आलेले कार्यकर्ते माझ्या अंगावर धाऊन येत होते, अशी माहिती दिली.
हेही वाचा