शहरात आंबेडकरांच्या विचारांचा जागर; भीमगीतांसह बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष

शहरात आंबेडकरांच्या विचारांचा जागर; भीमगीतांसह बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष

पुणे : पुढारी वृत्तसेवा : 'सोनियाची उगवली सकाळ', 'जन्मास आले भीम बाळ…' 'भीमराज की बेटी मैं तो जयभीमवाली हूँ…' यासह विविध भीमगीतांनी दणाणलेला परिसर… आसमंतात घुमलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असोचा जयघोष… हाती निळा झेंडा, पांढरे अन् निळे कपडे घातलेल्या अनुयायांनी केलेली गर्दी अन् वैविध्यपूर्ण कार्यक्रमांमधून डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा झालेला जागर… असे वातावरण पुणे रेल्वे स्थानक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात रंगले होते. कॅम्पमध्येही असेच उत्साही वातावरण पाहायला मिळाले अन् अनुयायींनी मोठ्या हर्षोल्हासात राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली.

राजकीय नेते, विविध संस्था- संघटनांचे प्रतिनिधी आणि अनुयायींनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी केली. पुणे स्टेशन परिसरातील आणि कॅम्प परिसरातील डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात पांढर्‍या- निळ्या रंगातील भव्य मंडप आणि आकर्षक फुलांची सजावट केली होती. शनिवारी मध्यरात्री बारा वाजता डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शेकडो अनुयायांनी डॉ. आंबेडकर पुतळ्याच्या ठिकाणी येऊन पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.

पुणे स्टेशन परिसरातील डॉ. आंबेडकर पुतळ्याच्या ठिकाणी सकाळपासूनच संपूर्ण परिसर गर्दीने फुलून गेला होता. या ठिकाणी संस्था-संघटना आणि राजकीय पक्षांच्या वतीने विविध उपक्रमही आयोजित केले होते. तसेच, भीमगीतांच्या कार्यक्रमांनी वातावरण चैतन्यपूर्ण झाले. पुस्तकांचे स्टॉल्स, निळे झेंडे, महापुरुषांचे छायाचित्र, पोस्टर्स, मूर्ती, निळ्या टोप्या, बिल्ले अशा विविध स्टॉल्सही येथे लावण्यात आले. त्यातूनही डॉ. आंबेडकर यांचे विचार जनमानसांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. सकाळपासून झालेली गर्दी सायंकाळपर्यंत कायम होती. पोलिसांचा चोख बंदोबस्त येथे पाहायला मिळाला. डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी पुणे स्टेशन परिसरातील डॉ. आंबेडकर पुतळ्याच्या ठिकाणी जनसागर लोटला होता.

घरोघरीही जयंती साजरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त घरोघरीही चैतन्यपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. पांढर्‍या आणि निळ्या रंगातील वेशभूषा करून डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच, यानिमित्ताने घरी सहकुटुंब विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला.

सोशल मीडियाद्वारेही शुभेच्छांचा वर्षाव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीच्या शुभेच्छा सोशल मीडियाद्वारेही देण्यात आल्या. महामानवाच्या कार्याला सलाम करत अनेकांनी त्यांचे विचार अंगीकारावे, असे आवाहन फेसबुक, इन्स्टाग्रामद्वारे केले. व्हॉट्सअ‍ॅपलाही विविध संदेश पाठवून
जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news