जंगलात आढळणारा ‘तो’ दुर्मीळ जीव लवकरच पुण्यात!

जंगलात आढळणारा ‘तो’ दुर्मीळ जीव लवकरच पुण्यात!

पुणे : अतिशय वेगाने रानावनात धावणारे हरीण आपण अनेकदा पाहतो. सांभर, साधे हरीण, काळवीट यांसारखी अनेक प्रकारची हरणे आपल्याला माहिती आहेत. मात्र, पुणेकरांना पहिल्यांदाच कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात सर्वांत लहान आकाराची लाजाळू व दुर्मीळ हरणे (माऊस डिअर) पाहायला मिळणार आहेत. या प्रकारचे सुमारे 20 जीव लवकरच प्राणिसंग्रहालयात दाखल होतील.

प्राणिसंग्रहालय प्रशासनाकडून माऊस डिअरचा समूह आणण्याचे नियोजन करण्यात येत आहे. राज्य वन विभागाने रेस्क्यू केलेली अथवा हैदराबाद येथील प्राणिसंग्रहालयातून ही गोंडस हरणे आणली जाणार आहेत. तसा प्रस्ताव राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाने केंद्रीय ाणिसंग्रहालय प्राधिकरणाला दिला आहे.

आठ नर अन् बारा माद्या

आगामी काळात पुणेकरांना उंदराच्या आकाराची एकूण 20 हरणे पाहायला मिळतील. यामध्ये आठ नर, तर बारा माद्या असणार आहेत.

514 चौरस मीटरचे खंदक उभारणार

राजीव गांधी प्राणिसंग्रहालय प्रशासनाकडून माऊस डिअर आणल्यानंतर पर्यटकांना पाहण्यासाठी ठेवली जाणार आहेत. त्याकरिता प्राणिसंग्रहालयातच त्यांच्या निवासासाठी 514 चौरस मीटरचे खंदक उभारले जाणार आहे.

  • 'माऊस डिअर'ला पिसुरी हरीण तथा पिसोरी असे म्हणतात. हे हरीण इतर सर्व हरणांच्या जातींमध्ये सर्वांत लहान असते. पिसुरीचे डोके लहान असते, नाकपुड्या उंदरासारख्या टोकदार असतात, कस्तुरीमृगाप्रमाणेच त्यांना सुळे असतात. पिसुरी हरीण हे युग्मखुरी वर्गात गणल्या जाणार्‍या त्रागुलिडी कुळातील प्राणी असून, आग्नेय आशिया, दक्षिण आशियापासून मध्य व पश्चिम आफ्रिकेपर्यंत आढळतात. यांची खांद्यापर्यंतची उंची साधारण 25 ते 30 सें.मी. असते.
  • पिसुरी हरणाच्या दोन विशिष्ट जाती आढळतात. एक आशियाई पिसुरी हरीण व दुसरी आफ्रिकी पिसुरी हरीण. पश्चिम आणि मध्य आफ्रिकेच्या घनदाट जंगलात ते आढळते. आशियाई पिसुरी हरणाच्या पाच उपजाती आढळतात. यांपैकी एक उपजात भारतात आढळते. हे हरीण दक्षिण भारताच्या जंगलात, पश्चिम भागातील जंगलात आणि ओडिशाच्या पूर्व किनार्‍यावर आढळते.
  • याशिवाय बिहार आणि मध्य प्रदेशात 1800 मीटर उंचीवर ते राहतात. त्याची उंची 25 ते 30 सें.मी.पर्यंत असते. ते नदीजवळ किंवा तलाव किंवा झाडी असलेल्या खडकाळ भागात आपले घर बनवितात. त्यामुळेच ते जंगलात मुक्तपणे वावर करताना फारसे दिसत नाहीत. ते खडकाच्या कपारीत किंवा दगडाखाली लपून बसणे पसंत करतात. यांचे मुख्य अन्न जंगली वनस्पती, गवत, पाने इत्यादी आहे. ते खाली पडलेली फळेही खातात. या हरणांना पाणी फार आवडते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news