नासाने टिपला 30 हजार प्रकाशवर्षे दूर असलेल्या तार्‍यांचा समूह!

नासाने टिपला 30 हजार प्रकाशवर्षे दूर असलेल्या तार्‍यांचा समूह!

वॉशिंग्टन : 'नासा' या अमेरिकन अंतराळ संस्थेने 30 हजार प्रकाशवर्षे दूर असलेल्या तार्‍यांच्या समुहाचा एक व्हिडीओ शेअर करत आपले ब्रह्मांड किती विशाल आहे, याची आणखी एकदा प्रचिती दिली आहे. नासाने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरून ही पोस्ट करत असताना ट्विंकल, ट्विंकल लिलर वन, असे त्याचे वर्णन केले आहे. नासाने 'हबल' या अत्याधुनिक दुर्बिणीच्या माध्यमातून दोन व्हिडीओ शेअर केले आहेत.

नासाच्या हबल दुर्बिणीच्या माध्यमातून सातत्याने बह्मांडातील असंख्य रहस्यांचा वेध घेणारी छायाचित्रे टिपली जात असतात. या दुर्बिणीने आता दोन एकापेक्षा एक सरस असे व्हिडीओदेखील टिपले आहेत.

तारांगणांच्या या अनमोल जगतात आपले खास स्वागत. छायाचित्रातील तारांचा समूह हा 30 हजार प्रकाशवर्षे दूर आहे. यापैकी एक तारासमूह 12 अब्ज वर्षे जुना, तर एक तारासमूह 1 ते 2 अब्ज वर्षे जुना आहे. याचाच अर्थ असा आहे की, लिलर वन हा समूह बराच आधी निर्मिला गेलेला आहे, असे नासाने या पोस्टमध्ये म्हटले आहे. या व्हिडीओला 3 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले तर 27 हजारांपेक्षा अधिक जणांनी त्याला लाईक्स दिले आहेत. अनेक युजर्सनी हा इतका अनमोल व्हिडीओ उपलब्ध करून दिल्याबद्दल नासा व हर्बल दुर्बिणीचे खास आभार मानले. ब्रह्मांडातील सारा समूह आजच्या नव्या पिढीला, घरबसल्या पहायला, अभ्यासायला मिळतो आहे, हे त्यांचे भाग्यच मानायला हवे, ते या निकषावर किती सुदैवी आहेत, हे त्यांना कळणारही नाही, असे एका युजरने यावेळी नमूद केले. आपण ज्यावेळी शाळेत होतो, त्यावेळी शास्त्राशी संबंधित पुस्तकातून मिळणारी माहिती हा एकमेव स्त्रोत होता आणि त्यालाही बर्‍याच मर्यादा असायच्या, या आठवणीला आणखी एका युजरने उजाळा करून दिला.

आणखी एका युजरने अतिशय लक्षवेधी टिपणी केली. तो म्हणाला, 'अतिशय मनमोहक व्हिडीओ! आपण आपल्या निकटवर्तियाप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी वारेमाप पैसे खर्चून दागिन्यांची खरेदी करतो, त्यापेक्षाही तारांच्या समुहाची ही रचना कितीतरी लाख पटीने अनमोल आहे. आपल्या ब्रह्मांडात किती रहस्ये दडलेली आहेत, त्याचे हे उत्तम उदाहरण आहे.'

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news