मंचर : पुढारी वृत्तसेवा : खुनाच्या प्रयत्नासह अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या फरार सराईत आरोपीस मंचर पोलिसांनी शिताफीने पकडले. या आरोपीवर मंचर व खेड पोलिस ठाण्यात एकूण चार गुन्हे दाखल असून, सध्या त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मंगळवारी (दि. 9) रात्री ही कारवाई करण्यात आली. शुभम सुभाष तोत्रे (रा. पॅराडाईज सोसायटी, मंचर, ता. आंबेगाव) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. शुभम तोत्रे हा मंचर येथील लक्ष्मी रोड येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक
अरुण फुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने लक्ष्मी रोड येथे मंगळवारी (दि.9) रात्री सापळा लावला.
रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास शुभम हा लक्ष्मी रोड येथे गुढीपाडवा मिरवणुकीत दिसला. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच तो पळून जाऊ लागला. सहायक पोलिस निरीक्षक कांबळे व पोलिस पथकाने मंचर एसटी बसस्थानकापर्यंत पाठलाग करून त्याला पकडले.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील, पोलिस निरीक्षक अरुण फुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक बालाजी कांबळे, हवालदार एस. एन. नाडेकर व गुन्हे शोध पथकाचे पोलिस अंमलदार अविनाश दळवी, अजित पवार, योगेश रोडे यांनी केली.
हेही वाचा