Balochistan Pakistan | पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये दहशतवाद्यांनी केली ११ जणांची हत्या | पुढारी

Balochistan Pakistan | पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये दहशतवाद्यांनी केली ११ जणांची हत्या

पुढारी ऑनलाईन : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात अज्ञात दहशतवाद्यांनी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये बसमधील ९ प्रवाशांसह किमान ११ जणांची हत्या केली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. पहिल्या घटनेत शुक्रवारी सशस्त्र दहशतवाद्यांनी नोश्की जिल्ह्यातील महामार्गावर बस थांबवली आणि बंदुकीचा धाक दाखवून ९ जणांचे अपहरण केले होते, असे पोलिसांनी सांगितले. (Balochistan Pakistan)

या घटनेबाबत माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, “या ९ जणांचे मृतदेह डोंगराळ भागातील पुलाजवळ गोळ्या लागलेल्या अवस्थेत सापडले आहेत.” सदर बस क्वेट्टाहून तफ्तानच्या दिशेने जात होती. या दरम्यान सशस्त्र बंदुकधाऱ्यांनी ती थांबवली आणि प्रवाशांनी ओळख पटवल्यानंतर ९ जणांना डोंगराळ भागात नेले,” असेही अधिकाऱ्यांनी पुढे म्हटले.

दुसऱ्या एका घटनेत याच महामार्गावर एका कारवर गोळीबार करण्यात आला. या घटनेत दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. तर दोघे जखमी झाले. या घटनेबाबत बोलताना बलुचिस्तानचे मुख्यमंत्री मीर सर्फराज बुगती म्हणाले की, नोश्की महामार्गावर ११ जणांच्या हत्येमध्ये सहभाग असलेल्या दहशतवाद्यांना सोडले जाणार नाही आणि त्यांच्यावर लवकरच कारवाई केली जाईल.

संबंधित दहशतवाद्यांचा माग काढला जाईल, असे सांगून बुगती म्हणाले की, बलुचिस्तानमधील शांतता बिघडवण्याचा त्यांचा उद्देश होता. मंत्री मोहसीन नक्वी यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी सरकार मृतांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे असल्याचे म्हटले आहे. (Balochistan Pakistan)

या हत्याकांडांच्या घटनांची अद्याप कोणत्याही प्रतिबंधित संघटनेने जबाबदारी स्वीकारलेली नाही. पण या वर्षी अलिकडील काही दिवसांत बलुचिस्तान प्रांतात प्रतिबंधित संघटना आणि दहशतवाद्यांकडून दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे.

प्रतिबंधित बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने गेल्या काही दिवसांत माच शहर, ग्वादर बंदर आणि तुर्बतमधील नौदल तळावर तीन मोठे दहशतवादी हल्ले केल्याचा दावा केला आहे. यादरम्यान सुरक्षा दलांनी सुमारे १७ दहशतवाद्यांना ठार केले आहे.

हे ही वाचा :

Back to top button