पुढारी ऑनलाईन डेस्क : देशात एक व्यक्ती, एक पक्ष ही वृत्ती घातक आहे. एका व्यक्तीच्या हातात सत्ता देणे धोकादायक आहे. त्यामुळे आम्हाला मजबूत सरकार हवं आहे. परंतु ते संमिश्र सरकार हवे, सर्वाना सोबत घेऊन जाणारे सरकार हवे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री व शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (दि.१३) पत्रकार परिषदेत केले. Uddhav Thackeray on BJP
जळगावातील बीआरएसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज (दि.१३) मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधून घेतले. तसेच लक्ष्मण पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. Uddhav Thackeray on BJP
ते पुढे म्हणाले की, येणाऱ्या निवडणुकीत हुकुमशाहीविरोधात लोकशाही अशी लढत होणार आहे. लोकशाहीत प्रत्येकाला मते मांडण्याचा अधिकार आहे. परंतु, या पुढच्या निवडणुकीत मते मांडता येतील की नाही, याबाबत साशंकता आहे. उमेदवारांचा पत्ता नाही, आणि महायुतीच्या प्रचार सभा सुरू आहेत, अशी टीका त्यांनी महायुतीवर केली. महाविकास आघाडीच्या संयुक्त सभा लवकरच होणार आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले. केंद्र सरकारविरोधात देशभरात असंतोष आहे.
आम्हाला भारत सरकार हवंय, मोदी सरकार नको, आम्हाला मजबूत पण संमिश्र सरकार हवे आहे. सर्वांना सोबत घेऊन जाणारे सरकार हवे आहे. माजी पंतप्रधान नरसिंहराव, अटलबिहारी वाजपेयी, मनमोहनसिंह यांनी संमिश्र सरकार उत्तमपणे चालवले आहे, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा