चिकन तीनशे पार! दक्षिणेतील राज्यांतून झाली खरेदी, उन्हाच्या कडाक्याचा परिणाम | पुढारी

चिकन तीनशे पार! दक्षिणेतील राज्यांतून झाली खरेदी, उन्हाच्या कडाक्याचा परिणाम

पुणे : पुढारी वृत्तसेवा : हॉटेल असो की घर चिकनच्या झणझणीत तांबड्या-पांढर्‍या रस्स्यापासून फास्टफूडवर ताव मारण्याची संधी म्हणजे सामिष खवय्यांसाठी मेजवानीच. चिकनच्या भाजीपासून लॉलीपॉप, तंदूर, शॉरमा, सामोसा खाण्यासाठी हात सैल करणार्‍या खवय्यांना आता चिकनच्या वाढलेल्या दरामुळे हात आखडता घ्यावा लागणार आहे. बाजारात होत असलेल्या मागणीच्या तुलनेत पक्ष्यांचा पुरवठा कमी पडल्याने चिकनच्या भावात आठवडाभरात 40 ते 50 रुपयांनी वाढ झाली आहे. परिणामी, पहिल्यांदाच चिकनचे दर 300 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत.

उन्हाच्या चटक्याने पक्ष्यांच्या वाढीवर परिणाम होऊन दरवाढ झाल्याने जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यान हैदराबाद व तेलंगणातील खरेदीदारांनी राज्यातून मोठ्या प्रमाणात कोंबड्यांची खरेदी केली. राज्यात बहुतांश ठिकाणी पाण्याचे दुर्भीक्ष निर्माण झाल्याने पोल्ट्री चालकांनी पोल्ट्री व्यवसाय बंद केले. तसेच उन्हामुळे पक्षी खाद्य कमी व पाणी जास्त पित आहेत. पुरेसे खाद्य न खाल्ल्याने पक्ष्यांची वाढ होत नाही. त्यामुळे कोंबड्यांच्या आकारावर परिणाम झाला असून, त्यांच्या वाढीचा काळही लांबला आहे. पक्षी वजनाला कमी भरत असून, उत्पादनातही घट झाल्याने त्याचा परिणाम दरवाढीवर झाला आहे.

दर वाढण्यामागची प्रमुख कारणे

  •  पाण्याच्या दुर्भीक्षामुळे राज्यातील बहुतांश पोल्ट्री फार्म बंद
  •  दोन महिन्यांपूर्वी हैदराबाद, तेलंगणामधून मोठ्या प्रमाणात खरेदी
  •  उन्हाच्या चटक्यामुळे खाद्याऐवजी पाणी पिण्याकडे पक्ष्यांचा कल
  •  रमजानच्या महिन्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंटचालकांकडून मोठी मागणी

उत्पादन कमी व मागणी जास्त असल्याने चिकनला उच्चांकी दर मिळत आहेत. रमजानच्या शेवटच्या टप्प्यात मागणी वाढल्याने त्याचा जास्त परिणाम दरवाढीवर झाला आहे. कंपन्यांनीदेखील आकाराने छोटे पक्षी विक्रीसाठी काढण्यावर भर दिल्याने त्याचा परिणाम बाजारावर दिसून येत आहे.

– रूपेश परदेशी, संचालक, पुणे शहर बॉयलर असोसिएशन.

हेही वाचा

Back to top button