

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील दुष्काळी स्थितीमुळे उन्हाळी पिकांमधील भुईमूग, मूग, उडीद, सोयाबीन आणि मका या पिकांच्या पेरणी क्षेत्रात घट झाली आहे. मात्र, उन्हाळी भात, ज्वारी, बाजरी आणि तिळाच्या पेरणीत सरासरीहून अधिक वाढ झाली आहे. कृषी विभागाच्या 8 एप्रिलअखेरच्या ताज्या अहवालानुसार पेरणीची ही स्थिती दिसून आली आहे. राज्यातील उन्हाळी पिकांचे सरासरी क्षेत्र 3 लाख 49 हजार 759 हेक्टर असून प्रत्यक्षात 3 लाख 59 हजार 737 हेक्टरवर (103 टक्के) क्षेत्रावरील पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सरासरी क्षेत्राच्या उन्हाळी भाताची 200 टक्के, उन्हाळी ज्वारीची 192 टक्के, उन्हाळी बाजरीची 143 टक्के तर उन्हाळी तिळाची 323 टक्क्यांइतकी उच्चांकी पेरणी झाली आहे.
दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध असलेल्या पाण्याचा योग्य नियोजन करून शेतकर्यांनी पिकांच्या पेरणीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे सरासरी क्षेत्रापेक्षा भात, ज्वारी, बाजरी व तिळाची अधिक पेरणी होऊ शकली आहे. गतवर्षी उन्हाळी हंगामात सर्व पिकांची मिळून 4 लाख 60 हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली होती. ती चालूवर्षी सद्य:स्थितीत 3 लाख 59 हजार हेक्टरइतकी झाली आहे. म्हणजे एक लाख हेक्टरने पेरणी घटली आहे. धरणांमध्ये पाणीसाठा कमी झालेला आहे. त्याचा फटका पिकांची पेरणी कमी होण्यावर झाला.
मागील दोन वर्षांपूर्वी खरिपात सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्यामुळे उन्हाळी सोयाबीनचा पेरा बीजोत्पादनासाठी वाढविण्याचे प्रयत्न कृषी विभागाकडून करण्यात आले. त्याला शेतकर्यांनी प्रतिसादही दिला. मात्र, शास्त्रोक्त शिफारस नसून सोयाबीन बियाणांचा तुटवडा दूर करण्यासाठी उन्हाळी पेरा वाढविण्यात आला होता.
हेही वाचा