इंदापूर विधानसभेसाठी इच्छुकांची महायुतीत गर्दी : लोकसभेनंतर परस्परांत भिडणार?

इंदापूर विधानसभेसाठी इच्छुकांची महायुतीत गर्दी : लोकसभेनंतर परस्परांत भिडणार?
Published on
Updated on

इंदापूर : इंदापूर विधानसभेच्या जागेसाठी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भाजप यांच्यात रस्सीखेच सुरूच आहे. विधानसभेसाठी इच्छुक असणार्‍या अनेकांचा महायुतीत भरणा झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांनाच महायुतीच्या बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी कामाला लावले असले, तरी लोकसभेचा प्रचार थंडावताच हे इच्छुक परस्परांमध्ये भिडणार, हे नक्की आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडून अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्याने सर्वाधिक धक्का माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना बसला आहे. बारामती लोकसभेसाठी त्यांनी भाजपसाठी राजकीय ताकद पणाला लावत बारामतीची जागा जिंकायची, असा चंग बांधला होता. मात्र, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्याने त्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे. बारामती लोकसभेला चांगले काम करून इंदापूर विधानसभा पदरात पाडून घ्यायची, असा त्यांचा मनसुबा होता. ही जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा लढवत असल्याने पवार यांना खिंडीत पकडत इंदापूरची विधानसभेची जागा तरी पदरात पाडून घ्यायची, अशी रणनीती हर्षवर्धन पाटील यांनी आखली व विधानसभेच्या शब्दासाठी रणकंद पेटविले होते. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पालकत्व स्वीकारत असल्याच्या शब्दानंतर ते शमले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार, माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत आहेत. सध्यातरी लोकसभेच्या प्रचारात ते गुंतलेले आहेत. लोकसभेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी भाजपच्या कार्यकर्त्यांवर व हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीकेची झोड त्यांच्या कार्यकर्त्यांनी उठवली होती. पाटील यांनी पोलिस संरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे निवेदन देखील दिले होते. हा मुद्दा देखील चांगलाच गाजला होता. लोकसभा निवडणूक जाहीर होताच महायुतीतील सहकारी पक्षांच्या नेत्यांबद्दल काही बोलायचे नाही, अशी तंबी अजित पवार यांनी इंदापुरात येऊन दिल्यानंतर राष्ट्रवादीकडून माघार घेण्यात आली. मात्र, ही स्थिती लोकसभा निवडणुकीनंतर पाहायला मिळणार नाही.जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटात होते.

त्यांची या गटाकडून विधानसभेची उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर प्रवीण माने महायुतीमध्ये सामील झाल्याने त्यांच्याही विधानसभेच्या इच्छेचे काय होणार की लोकसभा होताच ते बंड करणार, हे पाहावे लागेल. विधानसभेसाठी इच्छुक असलेले हर्षवर्धन पाटील, दत्तात्रय भरणे, प्रवीण माने यांच्यासह इंदापूरचे मोहोळचे आमदार, शेळगावचे यशवंत माने, माजी आमदार गणपतराव पाटील यांचे पुत्र प्रतापराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, हे अनेक नेते महायुतीत असून, लोकसभेसाठी सुनेत्रा पवार यांचा प्रचार करीत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर हे नेते परस्परांविरुद्ध भिडल्याचे चित्र पाहायला मिळाले तर नवल वाटायला नको.

जगदाळे यांची भूमिका ठरेना

इंदापूर तालुक्याच्या राजकारणातील आणखी एक मोठे नेते म्हणजे पुणे जिल्हा बँकेचे संचालक, जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी आपली अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. ते लवकरच कोणत्यातरी एका व्यासपीठावर दिसतील, अशी चर्चा आहे. सध्या त्यांच्या घरी कार्यकर्त्यांच्या हालचाली वाढल्या आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news