विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज : डॉ. प्रतापसिंह जाधव | पुढारी

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज : डॉ. प्रतापसिंह जाधव

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : 21 व्या शतकात ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञानाचा प्रचंड विस्फोट होत आहे. देशाला आर्थिक महासत्ता करण्याचे स्वप्न पाहणार्‍या विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे, असे प्रतिपादन दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी केले. रेलिश इन्फोसॉफ्ट या शाहूपुरी येथील नूतन वास्तूच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हे आगामी काळात मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवणार आहेत. त्यामुळे आजच्या शिक्षिकांनी प्रथम विद्यार्थी म्हणून शिकायचं आणि मग विद्यार्थ्यांना शिकवणे काळाची गरज असल्याचे सांगून डॉ. जाधव म्हणाले, आगामी काळात तंत्रज्ञान हे खर्‍या अर्थाने गेमचेंजर होणार आहे. अ‍ॅनिमेशन करणार्‍या युवकांना जगभरात मोठी मागणी आहे. मुळातच अ‍ॅनिमेशन हा शब्द ‘अ‍ॅनिमॉर’ या लॅटिन शब्दापासून तयार झाला आहे. अ‍ॅनिमेशन म्हणजे एखाद्या वस्तूत किंवा प्रतिमेत प्राण भरून ती सजीव करून दाखवणे. ‘टॉम अ‍ॅण्ड जेरी’, ‘डोरेमॉन’, बालगोपालांच्या आवडीचे चित्रपट व मालिका तयार होत होत्या, हे सर्व अ‍ॅनिमेशनचे आविष्कार होते.

हाच धागा पकडून रेलिश इन्फोसॉफ्ट या कंपनीने आजपर्यंत 7 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना आधुनिक ज्ञान देऊन देश-विदेशात नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. रेलिश इन्फोसॉफ्ट या कंपनीबरोबरच रेलिश एफ. एक्स., रेलिश एंटरटेनमेंट या कंपन्याही सुरू करून नव्या क्षेत्रात पदार्पण केले आहे. या कंपनीच्या 60 हून अधिक शाखा असून, या संस्थेला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

रेलिश या कंपनीने अ‍ॅनिमेशन क्षेत्रातच भरीव कामगिरी केली आहे. कंपनीने आजपर्यंत 150 हून अधिक हॉलीवूड, बॉलीवूड, टॉलीवूड चित्रपटांचे व्हीएफएक्सचे काम केले आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दुबई यां सारख्या देशांनी ‘रेलिश’ ला मान्यता दिली आहे. त्यामुळे कंपनी महाराष्ट्रापासून देशपातळीवर व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे.

हॉलीवूड मधील हर्क्युलस, स्पायडरमॅन, बॉलीवूड मधील ‘तान्हाजी’, ‘सिम्बा’, ‘एक था टायगर’ तसेच आर.आर.आर. ऑस्कर विजेत्या चित्रपटातील ‘नाटो नाटो’ या चित्रपटातील गाण्याचे काम ‘रेलिश’ कंपनीने केले आहे.

अ‍ॅनिमेशन बरोबरच आर्टिफिशिअल इंटेलिजन्सने प्रत्येक क्षेत्र व्यापून टाकले आहे. रेलिश इन्फोटेकने चित्रपटाच्या माध्यमातून अ‍ॅनिमेशन करत हिंदी, तमिळ तसेच हॉलीवूड चित्रपटांसाठी अ‍ॅनिमेशन केले आहे. यासाठी त्यांचा विविध पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. ही कोल्हापूरसाठी कौतुकास्पद बाब आहे, असेही डॉ. जाधव यांनी सांगितले.

माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी चित्रपट क्षेत्रात अ‍ॅनिमेशनला महत्त्व असून, तरुणांना या क्षेत्रात करिअरची संधी असल्याचे सांगितले. रेलिश इन्फोटेकचे संचालक पुनीत सिन्हा यांनी कोल्हापूरच्या संस्थेने अ‍ॅनिमेशन क्षेत्रात जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवला आहे, असे सांगितले. सौ. शिल्पा सिन्हा यांनी रेलिश संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी पारुल सिन्हा, अंशुल सिन्हा, सौ. सीमा कदम, गायत्री तिबिले व रेलिश इन्फोसॉफ्ट संस्थेचे कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button