Lok Sabha Election 2024 : पंजाबमध्ये कोणाचे बल्ले बल्ले?

Lok Sabha Election 2024 : पंजाबमध्ये कोणाचे बल्ले बल्ले?
Published on
Updated on

पंजाब : पंजाब लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पक्षासह शिरोमणी अकाली दल, काँग्रेस आणि भाजप या चारही तुल्यबळ पक्षांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यामुळे या राज्यात चौरंगी लढती रंगणार आहेत. परिणामी, लोकसभेच्या 13 जागांवरील निकालात पंजाबमध्ये कुठल्या पक्षाचे बल्ले बल्ले होणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागणार आहे.

मोदी सरकारने लागू केलेल्या तीन जाचक कृषी कायद्यांच्या निषेधार्थ उत्तर भारतातील शेतकर्‍यांनी सप्टेंबर 2020 मध्ये नवी दिल्लीच्या सीमेवरील महामार्गावर तीव्र धरणे आंदोलन सुरू केले होते. तब्बल सात महिने चाललेल्या या संघर्षात शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ शिरोमणी अकाली दलाने केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. या पक्षाचे नेते सुखबीरसिंग बादल यांच्या पत्नी हरसिमरन कौर – बादल यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धरणे आंदोलनातील शेतकर्‍यांना आश्वासने देऊनही ती पूर्ण केली नाहीत. त्यामुळे मोदी सरकारवर नाराज शिरोमणी अकाली दलाने एनडीए आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भाजपसोबत गेल्या 28 वर्षांपासून असलेली युतीही तोडली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभय पक्षांच्या नेत्यांमध्ये जागा वाटपाबाबत वाटाघाटी झाल्या, परंतु कुठलीही तडजोड होऊ शकली नाही.

पंजाबमधील तुरुंगात हत्या आणि दहशतवादाच्या आरोपात जन्मठेपेची जास्त काळ शिक्षा भोगणार्‍या कैद्यांना मुक्त करा, अशी मागणी शिरोमणी अकाली दलाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. मात्र, त्यांनी ती फेटाळून लावली. त्यामुळे या दोन्ही पक्षांमधील युती संपुष्टात येऊन भाजप व शिरोमणी अकाली दलाने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. तिकडे इंडिया आघाडीत एकत्र असलेल्या आम आदमी पक्ष व काँग्रेसने एकमेकांविरुद्ध उमेदवार उभे करून मैत्रीपूर्ण लढत देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत हे चारही पक्ष पहिल्यांदाच समोरासमोर आले आहेत.

पंजाबमध्ये गुरुदासपूर, अमृतसर, खंडूरसाहिब, जालंधर, होशियारपूर, आनंदपूर साहिब, लुधियाना, फतेहगड साहिब, फरीदकोट, फिरोजपूर, भटिंडा, संगरुर आणि पतियाळा, अशा लोकसभेच्या एकूण 13 जागा आहेत. याठिकाणी शेवटच्या सातव्या टप्प्यात एक जून रोजी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने सर्वात आधी आठ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामध्ये राज्यातील पाच कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश आहे. पंजाबी अभिनेत्री करमजीत अनमोल यांना फरिदकोटमधून, डॉ. बलबीर सिंग यांना पतियाळातून, तर गुरमीतसिंग मीत यांना संगरूर येथून उमेदवारी मिळाली आहे. कुलदीप धालीवाल अमृतसरमधून, गुरमीतसिंग खुंदियान भटिंडामधून, तर लालजीतसिंग भुल्लर खंडूरसाहिब मतदार संघातून नशीब आजमावत आहेत. गुरुप्रीतसिंग यांना फतेहगडसाहिब येथून उमेदवारी मिळाली आहे. जालंधरमध्ये 2023 च्या पोटनिवडणुकीत विजयी झालेले सुशीलकुमार रिंकू यांचीही उमेदवारी 'आप'ने जाहीर केली. मात्र, तरीही रिंकू यांनी 'आप'ला सोडचिठ्ठी देऊन भाजपशी घरोबा केला. 'आप'ने दुसर्‍या यादीत होशियारपूर येथून राजकुमार छब्बेवाल, तर आनंदपूर साहिबमधून मालविंदर सिंग कांग यांना उमेदवारी दिली.

भाजपनेही आपल्या 13 पैकी सहा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसमधून नुकतेच भाजपमध्ये आलेले रवनीतसिंग बिट्टू यांना लुधियानातून तर 'आप'च्या विद्यमान खासदार प्रीनीत कौर यांना पतियाळातून उमेदवारी मिळाली आहे. गेल्यावेळी पश्चिम दिल्लीतून निवडून गेलेले सुफी गायक हंसराज हंस यांना भाजपने फरिदकोटमधून रिंगणात उतरवले आहे. 'आप'ने तिकीट जाहीर करूनही भाजपकडे आलेले सुशीलकुमार रिंकू त्यांच्या लुधियाना मतदार संघातून पुन्हा लढत आहेत. दिनेशसिंग बब्बू गुरुदासपूर येथून रिंगणात आहेत. अमेरिकेतील माजी राजदूत तरनजीतसिंग संधू यांना भाजपने अमृतसरमधून उमेदवारी दिली आहे.

'आप'सोबत आघाडी करण्याची चर्चा फिस्कटल्यामुळे काँग्रेस पक्षाकडून सर्व 13 जागांवर उमेदवार उभे केले जाणार आहेत. मात्र, काँग्रेसने 'वेट अँड वॉच' ही भूमिका घेऊन अद्याप आपली उमेदवार यादी जाहीर केलेली नाही. शिरोमणी अकाली दलाकडूनही 'आप', काँग्रेस आणि भाजपच्या विरोधात तगड्या उमेदवारांचा शोध सुरू आहे. एकंदरीत पंजाबमध्ये चारही पक्षांनी निवडणुकीला पूर्ण शक्तिनिशी सामोरे जाण्याची जय्यत तयारी केली असून, या राज्यातील चौरंगी लढतीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news