वरंध घाटातील महाडच्या हद्दीतील वाहतूक बंद : ‘हे’ आहे कारण | पुढारी

वरंध घाटातील महाडच्या हद्दीतील वाहतूक बंद : 'हे' आहे कारण

भोर : पुढारी वृत्तसेवा : वरंध घाट रस्त्याच्या कामामुळे वरंध घाटात महाडच्या बाजूची सर्व वाहतूक 30 मेपर्यंत बंद राहणार आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि पोलिस विभागाकडून अहवाल मागविल्यानंतर रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सोमवारी (दि. 8) वरंध घाटातील महाडच्या हद्दीतील वाहतूक बंद करण्याचा आदेश दिला. त्यामुळे भोरमार्गे महाड व कोकणात जाता येणार नाही. मात्र वरंधा घाटातील भोरच्या हद्दीतील वाघजाई मंदिरापर्यंत म्हणजे भोरपासून सुमारे 50 किलोमीटरच्या हद्दीपर्यंत वाहतूक सुरू राहणार आहे.
भोर परिसरात फिरायला येणार्‍या पर्यटकांना वरंध घाट बंद असल्याचा काहीही फरक पडणार नाही. पर्यटकांना नेहमीप्रमाणे पर्यटनाचा आनंद घेऊन पुन्हा भोरमार्गेच परत घराकडे जावे लागणार आहे.

वरंध घाटातील वाघजाई मंदिराच्या पुढे भोर तालुक्याच्या हद्दीतील शेवटचे ठिकाण असलेल्या सुळका पॉइंटपर्यंत वाहने जाऊ शकतात. तेथून पुन्हा परत यावे लागणार आहे. वरंध घाटातील भोरच्या हद्दीतील रस्ता हा वाहनांसाठी खुला आहे. मात्र, भोर हद्दीच्या शेवटच्या ठिकाणाहून वाहने परत वळविण्यासाठी योग्य प्रकारची जागा नाही, त्यामुळे पर्यटकांना बसपेक्षा छोटी वाहने घेऊन यावे लागेल. याबाबत भोरचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, वरंध घाटातील भोर हद्दीतील वाहतूक बंद करण्याबाबत कोणतेही आदेश नाहीत. मात्र भोर वरंध घाट मार्गे महाडला जाता येणार नाही. घाटातील भोरच्या हद्दीपर्यंत वाहनांना जाण्यास परवानगी असल्याचे त्यांनी नमूद केले.

सावकाश वाहने चालवावीत

पर्यटकांनी वरंध घाटातून वाहने सावकाश चालवावीत. घाटात रस्त्याचे डांबरीकरणाचे काम चांगले असल्यामुळे वाहनांचा वेग वाढत असतो. परंतु घाटात वेडीवाकडी वळणे असून तेथे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून वाहने दरीत कोसळून अनेक अपघात झालेले आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी वरंध घाटातून वाहने चालविताना योग्य ती खबरदारी घ्यावी, असे भोर पोलिस ठाण्याकडून आवाहन करण्यात येत आहे.

हेही वाचा

Back to top button