आणखी किती बळी जाण्याची वाट पाहताय? बिबवेवाडीतील नागरिकांचा सवाल

आणखी किती बळी जाण्याची वाट पाहताय? बिबवेवाडीतील नागरिकांचा सवाल

बिबवेवाडी : बिबवेवाडीतील विविध विकासकामांसाठी केलेल्या रस्त्यांच्या खोदाईमुळे दर महिन्याला अपघात आणि बळींची संख्या वाढत आहे. सोमवारी (दि. 8) झालेल्या अपघातात एका बालकाचा बळी गेल्याने परिसरातील नागरिकांत असंतोष निर्माण झाला आहे. विकासकामे संथ गतीने सुरू असल्यामुळे ही समस्या निर्माण झाली असून, अजून किती बळी जाण्याची वाट महापालिका प्रशासन पाहत आहे, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

बिबवेवाडी परिसरात महापालिकेच्या वतीने गेले दोन वर्षांपासून विविध विकासकामांसाठी सातत्याने रस्त्यांची खोदाई करण्यात येत आहे. यामुळे वाहतुकीची समस्या गंभीर होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दोन किलोमीटर रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटी करणासाठी दोन वर्षांचा कालावधी लागत आहे. तरी देखील हे काम पूर्ण होण्यास आणखी वेळ लागेल, असे अधिकारी सांगत आहेत. विकासकामे करताना पर्यायी वाहतूक मार्गांसह नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुरेशा उपाययोजना करण्यात येत नसल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे. अप्पर डेपोजवळ झालेल्या अपघातात एका चिमुरड्याचा नाहक बळी गेला आहे. परिसरात संथ गतीने सुरू असलेल्या विकासकामांमुळे अपघात होत आहेत. एकाच कामासाठी अनेक ठेकेदार असल्यामुळे या कामांत सुसूत्रता नाही. तसेच, अधिकार्‍यांकडून योग्य नियोजन करण्यात आले नसल्याने या भागात अपघातांची संख्या वाढत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

अप्पर परिसरात रस्तेखोदाईमुळे वाहतूक कोंडी होत आहे. प्रशासनाने ही समस्या तातडीने न सोडविल्यास आंदोलन केले जाईन.

-संजय वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते, अप्पर

बिबवेवाडीतील विकासकामांना थोडाफार उशीर होत आहे. विविध अडथळ्यांमुळे ही समस्या निर्माण झाली आहे. मात्र, पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण केले जातील.

-अमर शिंदे, कार्यकारी अभियंता, रस्ते विभाग, महापालिका.

बिबवेवाडी परिसरात विकासकामांमुळे होत असलेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत महापालिका प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे. रस्त्यांवरील अनधिकृत पार्किंग, पथारी व्यावसायिकांवर कारवाई केली जाणार आहे.

-यश बोराटे, पोलिस उपनिरीक्षक, वाहतूक शाखा

अप्पर डेपो परिसरात अतिक्रमणांवर कारवाई

अप्पर डेपो परिसरात सोमवारी (दि. 9) टेम्पोची धडक बसल्याने बालकाला जीव गमावावा लागला आहे. या अपघातानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला खडबडून जाग आली असून, मंगळवारी येथील रस्त्यावर झालेल्या पथारी व्यावसायिक व भाजी विक्रेत्यांच्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. परंतु, ही कारवाई केवळ तात्पुरती मलमपट्टी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या भागातील रस्त्यांवर पथारी व्यावसायिक व भाजी विक्रेत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच खोदाई करण्यात आल्यामुळे येथील रस्तावाहतुकीसाठी अरुंद झाला आहे.

रस्त्याच्या कडेला वाहनांचे अनधिकृत पार्किंग केले जात असल्यामुळे वाहतुकीची समस्या गंभीर झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते अजय भोकरे म्हणाले की, या रस्त्यावर अतिक्रमणे झाल्यामुळे वाहतुकीची समस्या गंभीर झाली आहे. पालिका प्रशासन व वाहतूक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. विद्यार्थी व पदाचार्‍यांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून चालावे लागत आहे. अपघाताची घटना घडल्यानंतर अतिक्रमण विभागाने तातडीने कारवाई केली आहे. मात्र, ही समस्या सोडविण्यासाठी कायम स्वरूपी उपाय योजना होणे गरजेचे आहे.

अप्पर डेपो परिसरात रस्त्याचे काम सुरू आहे. पथारी व्यावसायिक व भाजी विक्रेत्यांमुळे वाहतुकीस अडथळा होत असल्यामुळे यापुढे रस्त्यावरील अतिक्रमणांवर नियमित कारवाई केली जाणार आहे.

– महेश मारणे, अतिक्रमण निरीक्षक, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news