पुणे : पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्ष फोडून काय मिळवले? त्यांना मनातून वाईट वाटत असेल की, काय परिस्थिती करून बसलो. तिथे मी दादा होतो, इथे दा म्हणायला पण भीती वाटत आहे. महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचा अजित पवार यांनी बट्ट्याबोळ केला. कार्यकर्त्यांचे वाटोळे करण्याचे काम अजित पवार यांनी केल्याची घणाघाती टीका माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली.
जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी निश्चितीसाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात सोमवारी (दि. 8) बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी आव्हाड आले होते, त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आव्हाड म्हणाले, पूर्वी अजित पवारांना पुणे शहराबाबत अथवा लोकसभेच्या, विधानसभेच्या वर इतर उमेदवारांच्या याद्यांबाबत चर्चा करायची असेल, तर ते पुण्यात येऊन शरद पवार यांच्याशी चर्चा करायचे आणि अंतिम निर्णय होत होता. अजित पवारांच्या वाट्याला पंचपक्वान्न होती, मात्र कधी कधी माणसाला ती नकोशी होतात आणि पत्रावळीवर जाऊन बसतात. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना अजित पवार येणार असतील, तर त्यांची वाट बघितली जायची.
मात्र, आता अजित पवारांना तिकडे जाऊन मला कधी बोलवतात, असं म्हणत ताटकळत बसत आहेत. माणसं कधी कधी कर्माने आणि आपल्या कृतीने अडचणी येत असतात. भविष्यात इतिहासामध्ये अजित पवार हे एक उदाहरण असतील जे भरलेले ताट सोडून पत्रावळीवरती जाऊन बसले, अशी टीका आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर केली. पुण्यातील गुन्हेगारी ही मुंबईपेक्षाही भयंकर झाली असून, पुण्याचे पालकमंत्री हे चंद्रपूर, अमेरिका, इंग्लंड सगळीकडे फिरत असतात. सगळ्यांबद्दल बोलत असतात, पुण्याबद्दल काहीच बोलत नाहीत, असं म्हणत आव्हाड यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाबाबत बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, एकनाथ खडसे यांच्या मनाला पटले म्हणून ते भाजपमध्ये गेले. आता त्यांच्याबाबत जास्त काही बोलण्यासारखं राहिलेलं नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थी-विद्यार्थिनीला बाहेरच्या गुंडांकडून मारहाण होते, तरीही कोणाला अटक होत नाही, अशी टीकाही आव्हाड यांनी केली.
वंचित आघाडीची उमेदवारी मिळालेल्या वसंत मोरे यांचे आंबेडकरी चळवळ, संविधानासाठी काय योगदान आहे. मोरे यांनी कोणते आंदोलन केले? कोणत्या दलितांच्या मदतीला गेले? केवळ महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांची मते खायची आणि मुरलीधर मोहोळ यांची मते वाढवायची इतकेच काम ते करणार आहेत. पण मुस्लिम, दलित यांना आता संविधान कोण वाचवणार आहे आणि कोणाला मते द्यायची हे चांगले कळले असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. वसंत मोरे आणि वंचित हे गणितच मला कळत नाही. वसंत मोरे यांची कलाकारी काय आहे हे मला समजलेलं नाही, अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली.
हेही वाचा