बेट भागात 40 च्या पाऱ्यात कांदा काढणी सुरू : शेतमजुरांच्या आरोग्याला धोका

बेट भागात 40 च्या पाऱ्यात कांदा काढणी सुरू : शेतमजुरांच्या आरोग्याला धोका

पिंपरखेड : पुढारी वृत्तसेवा : शिरूर तालुक्यातील बेट भागामध्ये उन्हाळी कांदा काढणी सुरू झाली आहे. मात्र, कमाल तापमानाचा पारा 40 अंशांवर गेल्याने अंगाची लाही लाही होत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी कांदा काढणीच्या कामात व्यस्त आहेत. या तीव्र उष्णतेचा परिणाम आरोग्यावर होऊन जुलाब, उलट्यासारखे त्रास होण्याची शक्यता असल्याने शेतमजूर, शेतकर्‍यांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. बेट भागातील पिंपरखेड, जांबुत, काठापूर, चांडोह, फाकटे, वडनेर, शरदवाडी या परिसरात मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याची लागवड केली जाते. या कांद्याची काढणी मार्च, एप्रिल महिन्यात केली जात असून सध्या सर्वत्र काढणी सुरू आहे.  तापमानाचा पारा 40 अंशांवर गेला आहे. अशा परिस्थितीत शेतकरी, शेतमजूर कडक उन्हाच्या झळा अंगावर झेलत कांदा काढणीचे काम करताना दिसत आहेत.

जुलाब, उलट्याचे रुग्ण वाढू लागले

कडक उन्हात काम केल्याने उष्णतेचा त्रास होऊन जुलाब, उलट्या अशा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. अनेकांना दिवसभराच्या उन्हात काम करून थकवा जाणवू लागल्याचे पहायला मिळत आहे. कडक उष्णतेमुळे आरोग्यावर परिणाम होऊन त्रास होत असल्याने रुग्ण गावातील स्थानिक डॉक्टरांकडे जाऊन प्राथमिक उपचार व सल्ला घेताना दिसत आहेत.

शेतकर्‍यांनी जुलाब, उलट्याचा त्रास होऊ नये यासाठी भरपूर पाणी प्यावे. शेतात काम करताना उन्हात ठेवलेले पाणी न पिता सावलीला ठेवलेले पाणी प्यावे. शेतकर्‍यांनी शेतात काम करताना 5 लिटर पाणी प्यावे. उन्हात काम करताना संरक्षणासाठी छत्री, डोक्यावर टोपी तसेच सावलीच्या उपाययोजना करून आरोग्याचे संरक्षण करावे.

– डॉ. रामदास पोखरकर, पिंपरखेड

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news