शेवटची ऑफलाइन सेट परीक्षा सुरळीत; पुढील वर्षापासून ऑनलाइनच | पुढारी

शेवटची ऑफलाइन सेट परीक्षा सुरळीत; पुढील वर्षापासून ऑनलाइनच

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सहायक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) रविवारी (दि. 7) सुरळीत पार पडली. विद्यापीठामार्फत घेण्यात आलेली ही शेवटची ऑफलाइन परीक्षा आहे. आता यापुढील काळात नेट परीक्षेसारखीच सेट परीक्षादेखील ऑनलाइनच होणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने यापूर्वीच स्पष्ट केलेे.
सहायक प्राध्यापक पदासाठी नेटच्या धर्तीवर राज्यस्तरावर सेट परीक्षा घेण्यात येते. महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांसाठी विद्यापीठाच्या सेट विभागाच्या माध्यमातून ही परीक्षा घेण्यात येते.

गेल्या वर्षी या परीक्षेसाठी एक लाख 19 हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती, तर यंदा एक लाख 28 हजार 243 उमेदवारांनी नोंदणी केली होती. महाराष्ट्र आणि गोव्यातील 17 शहरांतील 289 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. शेवटची ऑफलाइन परीक्षा असल्यामुळे प्रश्नपत्रिकेची काठिण्यपातळी कमी असेल, असा उमेदवारांचा समज होता. प्रत्यक्षात मात्र सेट पेपरच्या दोन्ही प्रश्नपत्रिकांची काठिण्यपातळी जास्तच असल्याचे दिसून आले. त्यातही पेपर एकचे प्रश्न जास्तच कठीण असल्याचे मत उमेदवारांनी व्यक्त केले.

19 हजारांवर गैरहजर

सेट परीक्षेसाठी 1 लाख 28 हजार 243 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 1 लाख 9 हजार 154 उमेदवारांनी सेट परीक्षेला हजेरी लावली, तर 19 हजार 89 उमेदवार गैरहजर राहिलेे. पुण्यात 21 हजार 17 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 17 हजार 245 परीक्षेला हजर राहिले, तर 3 हजार 772 उमेदवार गैरहजर राहिलेे.

हेही वाचा

Back to top button