Loksabha election : जो पाणी देईल त्याच्याच पाठीशी मतदार | पुढारी

Loksabha election : जो पाणी देईल त्याच्याच पाठीशी मतदार

ओतूर : पुढारी वृत्तसेवा : डुंबरवाडी, खामुंडी, गायमुखवाडी (ता. जुन्नर) या गावांना वगळून चिल्हेवाडी व पिंपळगाव जोगा धरण प्रकल्पाचा कालवा आणि बंदिस्त जलवाहिनी योजना राबविण्यात आल्याने ही तीनही गावे पाण्यासाठी टाहो फोडत असल्याची माहिती खामुंडीचे सामाजिक कार्यकर्ते कैलास बोडके, अनिल बोडके व श्रीकाळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे कार्याध्यक्ष संदीप गंभीर यांनी दिली.
ज्या पाच धरणांमुळे जुन्नर तालुका सुजलाम, सुफलाम झाला आहे. त्या तालुक्यातील तब्बल तीन गावे पाण्यापासून वंचित राहावीत ही खेदाची बाब असून, या भागात पाण्याची कुठलीच सोय नसल्याने आणि जुन्नर तालुक्यातील नेते मंडळींनी व्यवस्थित लक्ष न दिल्याने प्रत्येक उन्हाळ्यात या गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या तीन गावांचा विचार करून एखादी योजना राबविली असती, तर दुष्काळसदृश्य परिस्थिती प्रत्येक वर्षी निर्माण झाली नसती, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

या गावांच्या शेजारीच असलेल्या डोंगराच्या पायथ्यापासूनच्या जागेतून बंदिस्त जलवाहिनी किंवा पिंपळगाव जोगा धरणाचा कालवा मार्गस्थ झाला असता, तर आज या गावांमध्येदेखील हरितक्रांती झाली असती; सोबत सध्या सुरू असलेल्या चिल्हेवाडी बंदिस्त जलवाहिनी योजनेतून एस्केप टाकून व नेते मंडळींनी निधीची तजवीज केल्यास खामुंडी गावच्या पाझर तलावात पाणी सोडून सर्वांची तहान भागवता आली असती व शेतकर्‍यांना विद्युत पंपाद्वारे शेतीलादेखील पाणीपुरवठा करता आला असता.

सध्या शिरूर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून, तिरंगी लढतीच्या रिंगणातील कोणता उमेदवार या तीन गावच्या पाणी प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून ठोस पावले उचलणार त्याच्याच पाठीशी आम्ही मतदार उभे राहणार अशी चर्चा मतदारामधून व्यक्त होत आहे, आम्हाला केवळ आश्वासन नको; आमच्या हक्काच्या पाण्याची सोय तत्काळ करा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. अन्यथा आम्ही मतदानावर बहिष्कार घालण्याचा पवित्रा घेणार आहोत, असा सज्जड इशारा मतदार करीत आहेत.

दरम्यान, अणेमाळशेज पट्ट्यातील गावांमधून तीव्र कडक उन्हाच्या काहिलीने भलतीच ताप पडू लागली आहे. परिणामी, येथील विहिरींनी तळ गाठला असून, सर्व तलाव, ओढे, कूपनलिका कोरड्याठाक पडू लागल्या आहेत. भूगर्भातील पाणीपातळी झपाट्याने खालावू लागल्याने व अद्याप अडीच महिने पावसाची वाट पाहावी लागणार असल्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा व शेतीसाठी लागणार्‍या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीरस्वरूप धारण करू लागल्यामुळे शेतकरीवर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा

Back to top button