दुष्काळी झळा ! कळमोडीचे पाणी मिळणार कधी? चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर

दुष्काळी झळा ! कळमोडीचे पाणी मिळणार कधी? चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर
Published on
Updated on

वाफगाव : पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्याच्या पूर्व भागातील गावांचा कळमोडी पाणी योजनेत समावेश नसल्याने ही गावे दुष्काळाने होरपळत आहेत. या भागात पावसाळ्यात पाऊस कमी पडत असल्याने उन्हाळ्यात येथील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होतो. कळमोडीचे पाणी मिळल्यास येथील शेतीसिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटून गावे टँकरमुक्त होतील. परंतु, याबाबत शासनस्तरावर कोणताही निर्णय झाला नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

लोकसभा, विधानसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये येथील पाणीप्रश्नावर फक्त भाषणबाजी व चर्चा होते. कळमोडीचे पाणी देण्याचे आश्वासन राजकीय नेते मंडळी देतात. परंतु, शासनाच्या उदासीन धोरणामुळे हा प्रश्न मार्गी लागलेला नाही. खेड तालुक्याच्या पूर्व भागातील वाफगाव, पूर, कनेरसर, वरूडे, गोसासी, गुळाणी, वाकळवाडी, चौधरवाडी, गाडकवाडी, चिचबाईगाव, जऊळके बु॥ येथे पुरेसा पाऊस पडत नाही. ही गावे अवर्षणप्रवण क्षेत्रात येतात. यंदा वेळ नदीवरील बहुतांश बंधारे तसेच पाणवठे कोरडेठाक पडले आहेत. विहिरींनी तळ गाठला आहे. जनावरांना पुढील तीन महिने चारा व पाणी कसे द्यावे, असा प्रश्न शेतकर्‍यांच्या पुढे निर्माण झाला आहे. शासनाने या परिसरात लवकरात लवकर पाण्याचे टँकर सुरू करावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

पाणीटंचाईबाबत उपाययोजना करण्याची मागणी

पूर्व भागातील तीव्र पाणीटंचाईबाबत तातडीने उपाय योजना सुरू करण्याची मागणी कळमोडी पाणलोट विकास संस्थेचे अध्यक्ष अशोक टाव्हरे, दिलीप माशेरे, महेश लोखंडे तसेच सामाजिक कार्यकर्ते अमर बोर्‍हाडे यांनी उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे व तहसीलदार प्रशांत बेंडसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

तलाव, नदी, नाल्यांमधील गाळ काढा

एप्रिल व मे महिन्यात उन्हाच्या तीव्र झळांनी ही दुष्काळी गावे होरपळणार आहेत. जलजीवन मिशनची कामे अपूर्ण असल्याने या गावांना उन्हाळ्यात पिण्याचे पाणी मिळणार नाही. पाझर तलाव, बंधारे व ओढे-नाले यातील गाळ लोकसहभागातून काढला जावा. त्यामुळे साठवण क्षमता वाढेल. तसेच या भागात रोहयोची कामे व जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news