भारनियमनामुळे पिके संकटात; शेतकरी त्रस्त | पुढारी

भारनियमनामुळे पिके संकटात; शेतकरी त्रस्त

मंचर : पुढारी वृतसेवा : महावितरणने मोठ्या प्रमाणात भारनियमन सुरू केल्याने शेतीला पाणी देणे कठीण झाले आहे. पिके जळू लागल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यातच याला वाचा फोडणारे विविध राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. त्यामुळे महावितरणचे अधिकारी शेतक-यांना जुमानेसे झाले आहेत. भारनियमनामुळे शेतकर्‍यांना ऐन उन्हाळ्यात पिके वाचवण्यासाठी धडपड करावी लागत आहे. सध्या शेतीपंपाला आठ तास वीज मिळावी. मात्र, भारनियमन होत असल्याने तब्बल तीन ते चार तास वीजपुरवठा खंडित असतो. त्यामुळे पाणी उपलब्ध असूनही शेतीला देणे कठीण झाले आहे. पाण्याचा ताण बसल्याने पिके जळू लागली आहेत. अगोदरच शेतमालास बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यात भारनियमनाची भर पडल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे.

शेतकर्‍यांच्या समस्यांकडे लक्ष देण्यासाठी कार्यकर्त्यांना निवडणूक प्रचारामुळे वेळ नसल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्याने पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचारात व्यस्त झाले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांकडून विविध नेत्यांना उमेदवारी जाहीर झाल्या असून, त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. अनेकांनी निवडून आल्यास आपण शेतकर्‍यांचे न्याय हक्कासाठी लढू, असे आश्वासनदेखील दिले आहे. मात्र, सध्या भारनियमनामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍याच्या अडचणी सोडवण्याचा विसर नेत्यांना पडला आहे. याबाबत शेतकरीवर्गाने नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा

Back to top button