धायरीच्या पोकळे शाळेत अस्वच्छता अन् दुर्गंधी : विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात | पुढारी

धायरीच्या पोकळे शाळेत अस्वच्छता अन् दुर्गंधी : विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : सिंहगड रस्त्यावरील धायरी येथील वस्ताद हरिभाऊ पोकळे प्राथमिक व माध्यमिक शाळेत दुरवस्था झालेल्या स्वच्छतागृहांमुळे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांंचे आरोग्य धोक्यात आले आहे. एका खासगी संस्थेने स्वच्छतागृहांचा देखभाल ठेका घेतला; मात्र दुरुस्ती व स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने शाळेत डास, कीटक, माश्यांचा उपद्रव आणि दुर्गंधीमुळे विद्यार्थ्यांंसह शिक्षकांना गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे. अंगणवाडी, बालवाडी तसेच प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात दोन हजारांवर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

सहा महिन्यांपूर्वी एका खासगी संस्थेला स्वच्छतागृहांच्या देखभाल स्वच्छतेचा ठेका दिला आहे. त्याआधी आरोग्य विभागाकडून स्वच्छता केली जात होती. याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांनी स्वच्छतागृहांच्या दुरवस्थेबाबत वारंवार तक्रार करूनही कोणतीही दखल घेतलेली नाही. तसेच, संबंधित ठेकेदार संस्थेला स्वच्छतेबाबत आरोग्य विभागाने वारंवार सूचना दिल्या आहेत. असे असताना त्याची दखल घेतली जात नसल्याचे धायरी विभागाचे आरोग्य निरीक्षक अजय जगधने यांनी सांगितले. भाजपचे संघटक संदीप पोकळे यांनी स्वच्छतागृहांच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.

मात्र, स्वच्छतागृहांची संख्या कमी आहे. विद्यार्थ्यांना गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे. स्वच्छतागृहांचे उंबरठे तुटले आहेत. पाण्याचे नळ तुटले आहेत. त्यामुळे दुर्गंधीच्या पाण्याची डबकी साठली. स्वच्छतागृहांचे ड्रेनेजचे पाइप जीर्ण झाले आहेत. पाइपमधून गळती होत आहे. अपंग विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहांत सोय नसल्याने त्यांची कुचंबणा होत आहे. अनेक दिवसांपासून स्वच्छतागृहाची सफाई झाली नाही, दुर्गंधी पसरलेली आहे.

स्वच्छतागृहांची दुर्गंधी शाळेतून थेट रस्त्यापर्यंत पसरलेली आहे. सध्या वार्षिक परीक्षा सुरू आहे. जवळपास सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने विद्यार्थ्यांसह पालकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. वेळेवर बाथरूमला जाता येत नसल्याने अनेक विद्यार्थी आजारी पडले आहेत. स्वच्छतागृहांची तातडीने स्वच्छता करून आवश्यक दुरुस्ती करण्यात यावी.

– संदीप पोकळे, भाजप संघटक

यापूर्वी संबंधित ठेकेदाराला नियमित स्वच्छता करण्याचे आदेश दिले होते. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने स्वच्छतागृहांची तातडीने पाहणी केली जाणार आहे तसेच देखभाल स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणार्‍या ठेकेदारावर कारवाई करण्यात येणार आहे.

-संदीप खलाटे, सिंहायक आयुक्त , सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय

हेही वाचा

Back to top button