खवय्यांच्या खिशाला फटका तर पोल्ट्रीचालकांना ‘अच्छे दिन’; चिकन दरात वाढ  | पुढारी

खवय्यांच्या खिशाला फटका तर पोल्ट्रीचालकांना ‘अच्छे दिन’; चिकन दरात वाढ 

मंचर : पुढारी वृत्तसेवा : मागील हंगामात झालेला अत्यल्प पाऊस, त्यातच यंदा वाढलेली उन्हाची तीव्रता याचा परिणाम पोल्ट्री व्यवसायावर झाला आहे. पाण्याच्या टंचाईमुळे अनेकांनी व्यवसाय बंद केला आहे. त्यातच सुरू असलेला रमजान महिना, कांदा काढणीसाठी आलेले मजूर, लोकसभा निवडणुकीचा सुरू झालेला प्रचार यामुळे चिकनला मागणी वाढली आहे. परंतु, मागणी जादा व पुरवठा कमी असल्याने चिकनच्या भावात तेजी आली आहे. घाऊक बाजारात मालाची कमतरता जाणवत आहे. जिवंत कोंबडीचा दर प्रतिकिलो 135 रुपयांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना अच्छे दिन आले आहेत.

गेल्या आठवड्याभरापासून 200 रुपये किलोने मिळणारे चिकन प्रतिकिलो 240 रुपये झाले आहे. यंदा पाण्याची तीव्र टंचाई निमार्ण झाल्याने बहुतांशी पोल्ट्रीचालकांनी व्यवसाय बंद ठेवला आहे. ज्या पोल्ट्रीचालकांकडे पाणी आहे त्यांनीच व्यवसाय सुरू ठेवला आहे. मात्र, वाढत्या तापमानामुळे कोंबड्या मरण पावण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे बाजारात कोंबड्यांची आवक कमी प्रमाणात होत आहे.
बॉयलर कोंबडी तयार करण्यासाठी एक किलोला 80 ते 90 रुपये खर्च येतो. कोंबडीचे एक दिवसाचे पिल्लू 52 रुपयांपर्यंत आहे. मका आणि सोयाबीनचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत, त्यामुळे कोंबडी तयार करण्यासाठी खर्चामध्ये वाढ झाली आहे.

त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने बॉयलर कोंबडीच्या लिफ्टिंग रेटमध्ये मोठी वाढ केल्याने बॉयलर कोंबडीचे चिकन 240 रुपये किलो दराने विक्री होत असल्याची माहिती कळंब येथील ख्वाजा गरीब नवाज चिकनचे इसाक शेख आणि घोडेगाव येथील बॉयलर कोंबडीचे होलसेल व्यापारी जावेद मिस्त्री, फिरोज मिस्त्री यांनी दिली. लोकसभा निवडणुकादरम्यान मालाची कमतरता जाणवल्यास बॉयलर कोंबडीचे चिकन 250 ते 300 रुपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बॉयलर कोंबडीच्या लिफ्टिंग रेटमध्ये वाढ झाल्याने शेतकरी वर्गाला फायदा होणार असल्याचे चांडोली येथील पोल्ट्रीचालक वैशाली विजय थोरात, निरगुडसर येथील पोल्ट्रीचालक प्रकाश वळसे पाटील यांनी सांगितले.

चिकनचे दर अचानक वाढल्याने हॉटेल व्यावसायिकांनासुद्धा 150 ते 170 रुपयांत थाळी देणे परवडणार नसल्याने त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. याउलट अंड्यांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे. अंड्यांचे दर 460 रुपये शेकड्यापर्यंत आहेत. अंडी 72 रुपये डझनने विकली जात आहेत. बक-याच्या मटणालाही मागणी आहे. त्याचे भाव 660 ते 700 रुपये किलोप्रमाणे असल्याची माहिती एकलहरे येथील व्यापारी शेखर कांबळे यांनी सांगितली. पोल्ट्री व्यवसायात सध्या एसी पोल्ट्रीची संकल्पना रुजत आहे. चांडोली, कळंब परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अशा प्रकारच्या पोल्ट्री शेड तयार होत आहेत. यामध्ये, तिरंगा उद्योग समूहाचे नितीन बाळू भालेराव, सचिन सूर्यकांत कानडे, प्रमोद पिंगळे, शंतनु भालेराव यांच्यासारख्यांचा समावेश आहे. पोल्ट्री व्यवसायाला चांगले दिवस आल्याने या व्यवसायात अनेक शेतकरी सहभागी होत आहेत.

लोकसभा निवडणुकामुळे विविध गावांत पदाधिकार्‍यांकडून मांसाहारी पार्टी आयोजित केल्या जात आहेत. त्यामुळे चिकनला मागणी वाढली आहे. पुढील पंधरा दिवसांत चिकनच्या बाजारभावात वाढ होईल, असा अंदाज आहे.

– शफीभाई मोमीन, आंबेगाव अ‍ॅग्रो शिनोली.

उन्हाळ्यामुळे बर्‍याच ठिकाणी पोल्ट्री बंद आहेत. तसेच उष्णतेने कोंबडीचे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. विविध गावांतील जत्रा, निवडणुकांमुळे चिकनला मागणी वाढली आहे. त्यामुळे बाजारभाव कडाडल्याचे दिसून येते.

– प्रमोदशेठ हिंगे पाटील, ऊर्जा फूड्स.

हेही वाचा

Back to top button