शिवगंगा नदीपात्राने गाठला तळ : पाणीटंचाईच्या झळा, चार्‍याअभावी जनावरे विकण्याची वेळ | पुढारी

शिवगंगा नदीपात्राने गाठला तळ : पाणीटंचाईच्या झळा, चार्‍याअभावी जनावरे विकण्याची वेळ

नसरापूर : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातून वाहणार्‍या शिवगंगा नदीवरील बंधारे आटले असून, संपूर्ण नदीपात्र कोरडेठाक पडले आहे. यामुळे शिवगंगा खोर्‍यात पाणीबाणीचे संकट ओढवले आहे. नदीकाठावरील 20 ते 25 गावांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. त्यामुळे जनतेबरोबरच पशु-पक्षी तसेच वन्यप्राण्यांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. चारा मिळत नसल्याने जनावरे विकण्याची वेळ या भागातील शेतकर्‍यांवर आली आहे. शिवगंगा नदी पावसाळ्यात चार महिने दुधडी भरून वाहते. मात्र, गेल्या वर्षी पावसाचे पर्जन्यमान कमी राहिल्याने नदी कोरडीठाक पडली आहे.

नदीकाठावरील गावकर्‍यांना डिसेंबर महिन्यापासूनच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेक वर्षांपासून फेब्रुवारी – मार्च महिन्यात पाणीटंचाई निर्माण होते. यंदा पावसाच्या अवकृपेमुळे दिवाळीपासूनच नदीकाठावरील 20 ते 25 गावातील नागरिकांना पाणीटंचाईसह जनावरांच्या चार्‍याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. परिणामी, गावकरी हतबल झाले आहे. चारा, पाण्याच्या दुर्भिक्षामुळे जनावरे आठवडी बाजारात विकली जात आहेत. दुष्काळाची भयानकता वाढत असल्याने अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

गुंजवणी प्रकल्पाची प्रतीक्षा

बंद जलवाहिनीद्वारे पुरंदरकडे जाणार्‍या गुंजवणी प्रकल्पातून सायफन पद्धतीने स्थानिक शेतकर्‍यांना पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे. कुसगाव खिंडीतून येणार्‍या या प्रकल्पातून शिवगंगा नदीला पाणी मिळणार आहे. मात्र, संथगतीने या प्रकल्पाचे काम सुरू असल्याने शेतकर्‍यांना पाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे.

नदीपात्रात पाणी नसल्याने तरकारी पिके सुकून जात आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या मालाला कवडीमोल बाजारभाव मिळत आहे. कुसगाव खिंडीतून येणार्‍या गुंजवणी प्रकल्पाचे काम पूर्ण केल्यास शिवगंगा नदीला आवर्तन सुरू होईल. यासाठी शासनाने तातडीने दखल घ्यावी
श्यामसुंदर जायगुडे, प्रदेशाध्यक्ष, जय शिवराय किसान संघटना.

हेही वाचा

Back to top button