दूध अनुदानापोटी 109 कोटींचे वाटप : शेतकर्‍यांमध्ये समाधान | पुढारी

दूध अनुदानापोटी 109 कोटींचे वाटप : शेतकर्‍यांमध्ये समाधान

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारचा प्रतिलिटर पाच रुपये दूध अनुदान योजनेत जनावरांच्या टॅगिंगसह छाननीअंती दूध संस्थांच्या मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर सुमारे 109 कोटी 80 लाख 67 हजार 325 रुपयांइतके अनुदान 2 एप्रिलअखेर जमा करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण असून लवकरच परिपूर्ण प्रस्ताव
असलेल्या दूध डेअर्‍यांना पुढील अनुदान वाटप होणार आहे, अशी माहिती दुग्धव्यवसाय विकास आयुक्त प्रशांत मोहोड यांनी दिली.

जनावरांच्या टॅगिंगसह अनुषंगिक माहिती ऑनलाइनवर वेळेत भरण्याचे प्रमाण योजनेच्या सुरुवातीला कमी होते. त्यावर दुग्धव्यवसाय विकास सचिव तुकाराम मुंढे यांनी पशुसंवर्धन विभाग, दुग्धव्यवसाय विभाग आणि दूध डेअर्‍यांचा संयुक्त सहभाग वाढविण्यास प्राधान्य दिले. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी कार्यालय आणि आयुक्तालयात परिपूर्ण प्रस्तावांची संख्या वाढली. छाननीअंती अशा प्रस्तावांना मंजुरी देत सुमारे 2 लाख 55 हजार 351 शेतकर्‍यांच्या थेट लाभ हस्तांतरणाद्वारे बँक खात्यावर पाच रुपये अनुदानाची रक्कम तत्काळ जमा करण्यात आली.

दोन महिन्यांसाठी राबविलेल्या दूध अनुदान योजनेत प्रथम 280 कोटींचे अनुदान मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी दुग्ध विभागास 229 कोटींचे अनुदान रक्कम प्राप्त झाली आहे. योजनेनुसार आवश्यक माहिती ऑनलाइवर भरल्यानंतर संबंधित डेअर्‍यांनी शेतकर्‍यांच्या खात्यावर प्रतिलिटरला 27 रुपये जमा केले की, शासन पाच रुपये अनुदान देणार आहे. त्यानुसार सहकारी व खासगी डेअर्‍यांना दूध पुरवठा करणार्‍या शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ झालेला आहे. तसेच, पुढील दाखल झालेल्या दूध अनुदानाच्या परिपूर्ण प्रस्तावांची छाननी सुरू असून ती पूर्ण होताच पुढील आठवड्यात आणखी अनुदान वितरित होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

माहिती भरण्यासाठी 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

दूध संस्थांच्या मागणीवर सकारात्मक विचार करून दुग्धव्यवसाय विकास सचिव तुकाराम मुंढे यांनी अधिकाधिक शेतकर्‍यांना योजनेचा लाभ देण्यास प्राधान्य दिले आहे. योजनेंतर्गत दिनांक 11 जानेवारी 2024 ते 10 मार्च 2024 पर्यंतच्या कालावधीत दूध उत्पादक शेतकर्‍यांची माहिती संगणक प्रणालीमध्ये भरण्यासाठी दिनांक 15 एप्रिलपर्यंत सर्व दसवड्याकरिता (दहा दिवस) एक मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच, 26 मार्च 2024 पर्यंत ज्या जनावरांची पडताळणी झाली असेल, त्यांचाच समावेश या दसवड्यामध्ये करण्यात यावा, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा

Back to top button