दुर्दैवी ! खडकीत वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू : आंबेडकर रस्त्यावरील घटना | पुढारी

दुर्दैवी ! खडकीत वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू : आंबेडकर रस्त्यावरील घटना

पुणे/खडकी : पुढारी वृत्तसेवा : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावर अष्टविनायक व्यापारी तरुण मंडळाच्या गणपतीसमोर एका अज्ञात व्यक्तीला चारचाकी वाहनाची धडक बसली. या अपघातात अज्ञात व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, ही घटना बुधवारी (दि. 3) सकाळी पावणेनऊच्या सुमारास घडली. सकाळी अपघात झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी झाली होती.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक अज्ञात व्यक्ती सराफ गल्लीतून व्यापारी मित्रमंडळाच्या चौकाकडे पायी जात होता, त्या वेळी रस्त्यावर वाहनाची प्रचंड वर्दळ होती. अज्ञात व्यक्ती रस्ता ओलांडताना एका वाहनाचा धक्का लागल्याने तो खाली पडला, त्या वेळी दुसर्‍या चारचाकी वाहनाचे चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, सकाळच्या वेळी अपघात झाल्याने काही व्यक्तींनी अ‍ॅम्ब्युलन्स बोलवण्यासाठी अनेकवेळा फोन केले. मात्र, अ‍ॅम्ब्युलन्स चक्क अर्धा तासानंतर पोहोचल्याचे स्थानिक रहिवासी गणेश कांबळे यांनी सांगितले.

पुणे-मुंबई रस्त्याचे काम सुरू असल्याने बोपोडीकडून खडकीकडे जाणार्‍या डॉ. आंबेडकर मार्गावर एकेरी वाहतूक सुरू केली आहे. एकेरी वाहतुकीमुळे या रस्त्यावर प्रचंड प्रमाणावर वाहतुकीची वर्दळ वाढली आहे. दोन्ही रस्त्यांवर एकेरी वाहतूक केल्यामुळे प्रचंड वर्दळीमुळे रस्ता ओलांडणे जिकिरीचे झाले आहे. अपघात झाल्यावर डॉ. आंबेडकर रस्त्यावर प्रचंड प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक कोंडीमुळे सकाळच्या वेळी काही ठिकाणी वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस उपस्थित होते. मात्र, काही काळानंतर हे पोलिसदेखील गायब झाल्याचे नागरिकांनी सांगितले. या अपघातप्रकरणी पोलिसांना वाहनाचा तपास लागल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button