छत्रपती संभाजीनगरात अग्नितांडव; एकाच कुटुंबातील सात मृत्युमुखी | पुढारी

छत्रपती संभाजीनगरात अग्नितांडव; एकाच कुटुंबातील सात मृत्युमुखी

छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा : कापड दुकानाला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सातजणांचा मृत्यू झाला. यात दोघांचा होरपळून, तर पाचजणांचा गुदमरून मृत्यू झाला. ही घटना छावणी भागात दाणा बाजार येथील जैन मंदिराजवळील किंग्स स्टाईल टेलर दुकानाच्या इमारतीत बुधवारी (दि. 3) पहाटे 3.20 वाजता घडली. ई-बाईकच्या बॅटरीचा ओव्हर चार्जिंगमुळे स्फोट होऊन, ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. महावितरणच्या अधिकार्‍यांनी तसा दुजोरा दिला आहे.

हमिदा बेगम अब्दुल अजीज (वय 55), वसीम शेख अब्दुल आजीज (35), तन्वीर वसीम शेख (27), शेख सोहेल अब्दुल अजीज (32), रेश्मा शेख सोहेल शेख (22), असीम वसीम शेख (3) आणि महानूर ऊर्फ परी वसीम शेख (2) अशी मृतांची नावे आहेत. हे सर्वजण एकाच कुटुंबातील असून, सोहेल आणि त्याची पत्नी रेश्मा हे होरपळून, तर उर्वरित पाचजणांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
अधिक माहितीनुसार, आग लागलेल्या इमारतीत खाली शेख अस्लम शेख युनूस (55) यांचे 30 वर्षे जुने कापड दुकान आहे. पहिल्या मजल्यावर शेख अस्लम यांचे 7 जणांचे कुटुंब राहते. दुसर्‍या मजल्यावर हमिदा बेगम यांचे सातजणांचे आणि तिसर्‍या मजल्यावर एक दाम्पत्य, असे 16 जण राहतात.

रमजाननिमित्त शेख अस्लम यांनी कापडांचा मोठा साठा केला होता. शिवाय, ते नवीन ड्रेस शिवून द्यायचे. त्यासाठीही अनेक कपडे त्यांच्याकडे आलेले होते. त्यांचे संपूर्ण दुकान कपड्यांनी भरलेले होते. 3 एप्रिलला पहाटे 3 वाजेपर्यंत त्यांचे दुकानात काम सुरू होते. तीन वाजता दुकान बंद करून ते पहिल्या मजल्यावरील घरात गेले. त्यानंतर अवघ्या 20 मिनिटांत दुकानाला आग लागली. काही क्षणात धुराचे आणि ज्वाळांचे लोट शटरमधून बाहेर आले. यामुळे शेजारच्यांना जाग आली. त्यांनी आरडाओरड सुरू केल्यावर अस्लम शेख यांचे अख्खे कुटुंबीय गॅलरीच्या बाजूने सिडीच्या साहाय्याने खाली उतरले. त्यात त्यांचा जीव वाचला. तिसर्‍या मजल्यावर शेख मलिक (30) आणि त्यांच्या पत्नीनेही गच्चीवरून शेजारच्या इमारतीवर उतरून जीव वाचविला.

झोपेनेच कुटुंबाचा घात

दुसर्‍या मजल्यावरील हमिदा बेगम अब्दुल अजीज यांचे कुटुंब आग लागली तेव्हा गाढ झोपेत होते. कुलर लावून ते झोपलेले होते. आग लागल्यावर सर्वात आधी शेजारचे सचिन दुबे, समोरील गौरव बडजाते यांना जाग आली. त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे पहिल्या मजल्यावरील अस्लम शेख यांचे कुटुंंबीय जागे झाले. त्यांनी आपापले जीव वाचविले. तिसर्‍या मजल्यावरील दाम्पत्यदेखील उडी मारून शेजारच्या गच्चीवर गेले. मात्र, हमिदा बेगम यांच्या कुटुंबाला लवकर जाग आली नाही. अस्लम शेख यांनी एकदा वर जाऊन दरवाजा वाजविला, तरीही हमिदा यांचे कुटुंबीय जागे झाले नाही. कदाचित कुलर चालू असल्याने बाहेरचा आवाजच त्यांच्यापर्यंत गेला नसावा. काही वेळाने जाग आल्यावर सोहेल आणि त्याची पत्नी रेश्मा यांनी जीव वाचविण्यासाठी जिन्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला; पण तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. तेथेच त्यांचा होरपळून मृत्यू झाला. त्याचवेळी धुराचे लोट घरात घुसल्याने हमिदा यांच्यासह वसीम, तन्वीर आणि असीम व महानूर ऊर्फ परी हे सर्वजण गुदमरून मृत्युमुखी पडले.

घटनास्थळी पालकमंत्री संदीपान भुमरे, मंत्री अतुल सावे, खा. इम्तियाज जलील, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलिस आयुक्त मनोज लोहिया, उपायुक्त नितीन बगाटे, सहायक आयुक्त महेंद्र देशमुख, पोलिस निरीक्षक राजेंद्र होळकर यांनी पाहणी केली.

हमिदा यांच्या कुटुंबावर सातत्याने आघात

– शहरातील मूळ रहिवासी असलेले अब्दुल अजीज यांचा 15 वर्षांपूर्वी रांजणगाव भागात खून झाला होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यांच्या पश्चात पत्नी हमिदा बेगम यांनी एकटीने दोन्ही मुलांचा सांभाळ केला.
– दीड ते दोन वर्षांपूर्वी हमिदा बेगम यांची सून रेश्मा सोहेल शेख हिचे जुळे अपत्य जन्मानंतर एक-एक दिवसाच्या अंतराने मृत झाले होते. त्यानंतर अनेक दिवस हे कुटुंब दु:खात होते.
– दरम्यान, रेश्मा पुन्हा सात महिन्यांची गर्भवती असताना बुधवारच्या पहाटे काळाने हमिदा बेगम यांच्या संपूर्ण कुटुंबावरच घाला घातला. त्यांची दोन्ही मुले, दोन्ही सुना आणि दोन नातवंडांचा या आगीत दुर्दैवी मृत्यू झाला.

Back to top button